'भारता'साठी/स्वतंत्रते भगवती

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to searchस्वतंत्रते भगवती


 इंग्लंडमधून भारतातील शेतकरी आंदोलनाच्या आणि, विशेषतः शेतकरी संघटनेच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी रिचर्ड नावाचा एक विद्यार्थी हिंदुस्थानात आला आहे. गेला महिनाभर तो मला भेटायचा प्रयत्न करतो आहे आणि योगायोग असा की निवडणुकीतील प्रचाराच्या कामामुळे त्यांची माझी भेट प्रत्येक वेळी हुकत गेली. अखेरीस त्यांची इंग्लंडला परत जाण्याची वेळ आली आणि काल शेवटी टेलिफोनवरच काही प्रश्नोत्तरे करता आली. शेतकरी आंदोलनाच्या मागची प्रेरणा ही निर्बंधस्वातंत्र्याची आहे याचा सगळा इतिहास मी रिचर्ड यांच्यापुढे मांडला. शेवटी त्यांनी एक प्रश्न विचारला, "अमेरिकेतील स्वतंत्रावादी (यूँहे) आणि तुमच्या विचारात नेमका काय फरक आहे?"

 मी जे उत्तर दिले ते निवडणुकीचे पडघम वाजत असताना फार महत्त्वाचे आहे:

 "स्वातंत्र्य हे माझ्या दृष्टीने सर्वश्रेष्ठच नाही, एकमेव जीवनमूल्य आहे. सत्य, शिव, सुंदर किंवा समता, बंधुत्व ही सारी स्वातंत्र्याचीच रूपे आहेत. विचाराची शक्ती निसर्गाने फक्त 'व्यक्ती'ला दिली आहे. कोणत्याही 'समुदाया'ला नव्हे. त्यामुळे, प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्त्वाच्या अभिव्यक्तीच्या आड येणाऱ्या सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक संस्था या निसर्गक्रमाच्या विरुद्ध जाणाऱ्या आहेत. त्रिकालाबाधित आणि सम्यक सत्य अगदी परमेश्वराचा अवतारसुद्धा सांगू शकत नाही. अनंत सत्याचा आविष्कार व्यक्तीव्यक्तीतील परस्पर संपर्क, सहकार्य आणि स्पर्धा यांतूनच होऊ शकतो. स्पर्धा हा स्वातंत्र्याचा आत्मा आहे. कोणत्याही देशाच्या व्यवस्थेत व्यक्तिमत्वाच्या परिपोषास जास्तीत जास्त वाव असला पाहिजे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही हे खरे आहे. कोणत्याही एका देशाची सर्वंकष अधिसत्ता ही सर्व जगाच्या आणि प्रत्येक देशाच्या विकासास मारक

ठरते. प्रत्येक देशाने आपलेआपले व्यक्तिमत्त्व, संस्कृती, इतिहास आणि अर्थकारण जोपासावे. यासाठी राष्ट्र ही संकल्पना महत्त्वाची आहे. देशामध्ये व्यक्तीला आणि जगामध्ये इतिहास, भाषा, वंश आणि संस्कृती यांच्या आधाराने उभ्या राहिलेल्या राष्ट्रांना सर्वोपरी स्थान असले पाहिजे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या माझ्या निष्ठेतूनच राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती यांचा उगम होतो.

 "जन्माच्या अपघाताने लाभलेल्या धर्म, भाषा, वंश, जाति यांचा अभिमान बाळगणे हे क्षुद्रवादाचे लक्षण आहे. याउलट, आजच्या परिस्थितीत, 'राष्ट्र' या संकल्पनेला मोठे महत्त्व आहे.

 "अमेरिकेतील स्वतंत्रावादी, आयन रॅण्डचा अपवाद सोडल्यास, राष्ट्रभावनेला महत्त्व देत नाहीत किंवा त्या भावनेचा उपहासच करतात. माझे असे नाही. क्षुद्रवादाच्या माझ्या व्याख्येला अपवाद करत मी 'राष्ट्र' या संकल्पनेचे महत्त्व मानतो. एका अद्भुत जैविक बांधणीमुळे व्यक्तीला अनुभूती घेण्याची आणि विचार करण्याची शक्ती मिळते. अशीच शक्ती राष्ट्र या बांधणीलाही असते अशी इतिहासाची साक्ष आहे.

 "इतिहासामध्ये अनेक घडामोडी घडतात. सदासर्वकाळ राष्ट्रभावना सारखीच जाज्ज्वल्य राहिली असे नाही. व्यक्ती हे अनुभूतीचे आणि विचाराचे अनंतकालीन एकक आहे. माणसाने या शक्तीचा ईश्वरी ठेवा शाबूत ठेवण्यासाठी वेगवेगळे गट आणि संघटना तयार केल्या. जंगली माणसाच्या टोळ्या झाल्या, जातिव्यवस्थेची स्थापना झाली, धर्म, भाषा, वंश आणि भौगोलिक सलगता यांच्या आधाराने राष्ट्र उभी राहिली. हजारो वर्षांच्या आक्रमणांच्या, लढायांच्या आणि साम्राज्यवादाच्या इतिहासाने राष्ट्रांच्या भौगोलिक नकाशांची वारंवार आखणी आणि फेरआखणी केली; जगातील आजचे सर्व महत्त्वाचे देश जुन्या काळच्या विविध संघराज्ये आहेत.

 "आजच्या इतिहासात या संघराज्यांना जोडणारी महासंघराज्ये करण्याचाही कल आहे. याउलट, संघराज्यांचे विभाजन होऊन जास्त एकसंघ राष्ट्रे उभी रहाण्याचाही कल दिसतो. जगाची विभागणी आज राष्ट्रांत झाली आहे; उद्या ती, कदाचित, आंतरराष्ट्रीय कंपन्यांत होईल. एक गोष्ट निश्चित की, जागतिक व्यवस्थेत स्पर्धेत उतरणाऱ्या राष्ट्रसदृश संघटनांचा अनन्यसाधारण महत्त्व आहे."

 रिचर्ड या विद्यार्थ्याला मी हा मुद्दा इतक्या तपशीलाने सांगितला कारण हे बोलताना भारतातील आजच्या परिस्थितीत या सर्व सिद्धांतांचे संदर्भ मला जाणवत होते.

 योगायोगाची गोष्ट अशी की गेले काही आठवडे मी एका बाजूला निवडणुकांसंबंधी बातम्या ऐकतो आहे आणि बरोबरीने, दोन मोठी ऐतिहासिक महत्त्वाची पुस्तके वाचतो आहे. एक पुस्तक आहे सुभाषचंद्र बोस यांचे चरित्र 'महानायक' आणि दूसरे शहिद भगतसिंग यांचे चरित्र 'इन्कलाब'. निवडणुकांच्या या मोसमात अनुभूती आणि विचार यांच्या समानतेवर आधारलेल्या 'पक्ष' या संकल्पनेचेच विसर्जन झाले आहे. निवडणुकीतील लाभाच्या आशेने आणि हिशेबाने वेगवेगळ्या आघाड्या आणि युत्या बांधल्या जात आहेत. अनेक वर्ग आणि जाती सत्तेच्या खिरापतीत आपलाही हात असावा म्हणून असंभाव्य अशा क्षुद्रवादी मंचांची मोर्चेबंदी करीत आहेत. सगळा हिशेब आहे तो सत्तेच्या हव्यासाचा आणि राष्ट्रीय संपत्तीवर जास्तीत जास्त डल्ला मारण्याचा.

 याच शतकात सुभाषचंद्र आणि भगतसिंग यांच्यासारखी लोकोत्तर माणसे होऊन गेली आणि त्यांनी राष्ट्रभक्तीच्या भावनेने लाखलाख लोकांना आपल्या प्राणांच्या आहुत्या देण्यास तयार केले. हे चित्र खरे की ते चित्र खरे असा मनात संभ्रम तयार होतो.

 हा एवढा अधःपात झाला कसा?

 हुतात्मा भगतसिंग यांनी फाशीच्या कोठीकडे जाता जाता आपले एक स्वप्न मांडले ते इतके विद्रूप कसे झाले?

 महात्मा जोतिबा फुले यांनी देशाचे स्वातंत्र्य मिळवण्याची घाई करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला होता. "समाजाची 'गतशतकांची पापे घोरे' यांचे प्रक्षालन केल्याखेरीज इंग्रजांना हाकून लावण्याचाच धोशा लावला तर देशात पुन्हा एकदा 'पेशवाई' अवतरेल." जोतिबांना पडलेले हे दुःस्वप्न इतक्या भयानक पद्धतीने समोर येऊन कसे ठाकले?

 हरियाणाचे शेतकरी नेते सर छोटूराम यांनी गांधीजींना असाच इशारा दिला होता. "इंग्रजांनी देशात कायदा आणि सुव्यवस्था स्थापन केली आहे. विरोध करायचाच असेल तर ब्रिटिशांविरुद्ध दंड थोपटून पुढे व्हा. त्यांनी केलेल्या कायद्यांचा भंग सत्याग्रहाच्या नावाने करायची शिकवण लोकांना देऊ नका." सर छोटूराम यांचा दृष्टेपणा व्यर्थ का ठरला?

 सर विन्स्टन चर्चिल या एकाच माणसाने स्वातंत्र्योत्तर भारताचे अचूक भाकित सांगितले. "स्वातंत्र्याच्या आंदोलनातील गांधींचे सहकारी ही कचकड्याची बाहुली आहेत. यांच्यामागे काही आदर्शवाद नाही, प्रतिभा नाही, त्याग नाही. या असल्या नेत्यांच्या हाती देश गेला तर सर्वत्र बेबंदशाही माजेल, लोक एकमेकांच्या

उरावर बसतील. भारतातील गरिबांवर दया करा आणि या नंग्या फकिराच्या भुसकट सहकाऱ्यांच्या हाती सत्ता देऊ नका." चर्चिलचा कोणी राग करो, तिरस्कार करो; तो एक महान दृष्टा होतो हे कोणाला नाकारता येणार नाही.

 प्रांताप्रांतांतील आदिवासी समाजांनी आणि भद्र समाजातील काही तरुणांनी सशस्त्र क्रांतीचे केलेले उठाव इंग्रजांनी निघृणपणे दडपून टाकले. परिणामी, इंग्रजी सत्ता आणि शासन यांच्याशी सशस्त्र संघर्ष करण्यासाठी आवश्यक ती बांधणी, साधनसंपत्ती त्याबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान संपादन करणे या पिढीततरी शक्य होणार नाही अश्या निराशाग्रस्त भावनेने भारतीय जनतेने पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला. सत्य आणि अहिंसा या शस्त्रांनी व्यापक जनजागृती घडवता येते याचे प्रत्यक्ष उदाहरण गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत दाखवून दिले होते. गांधी भारतात परतल्यावर सर्वच जहालपंथी निष्प्रभ झाले; स्वातंत्र्यलढ्याचे अनभिषिक्त नेतृत्व गांधींकडे आले.

 'बिहारमध्ये भूकंप होऊन हजारो लोक मेले हा अस्पृश्यतेबद्दल मिळालेले प्रायश्चित्त आहे' असे अकटोविकट तर्कटही लोकांनी मुकाटपणे गिळले. चौरीचौरातील रणछोड नीतीचेही त्यांनी स्वागत केले. 'नौखालीतील हत्याकांड आपल्या व्यक्तिगत ब्रह्मचर्यातील कमजोरीमुळे झाले' हेही ऐकून घेतले. सुभाषचंद्र बोसांचा मोठ्या कारस्थानीपणाने केलेला तेजोभंग लोकांनी पाहिला. भगतसिंगांसारख्या हुतात्म्यांना 'वाट चुकलेले देशभक्त' असे नामाभिधान दिल्याचेही पाहिले. दक्षिण आफ्रिकेत बोअर युद्धातील इंग्रज सैन्यात भरती करण्यासाठी मोहीम चालवणारे गांधी महात्मा ठरले आणि दुसरे महायुद्ध ही इंग्रजांच्या विरोधात आवश्यक बांधणी, सामग्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान संपादन करण्याची संधी आहे असा विचार मांडणाऱ्यांना देशद्रोही ठरवले गेले.

 भारताला स्वातंत्र्य मिळाले याचे प्रमुख श्रेय हिटलरकडे जाते. जर्मनीने इंग्रजी साम्राज्याच्या नाकी नऊ आणले नसते तर इंग्रज भारतातील साम्राज्य सोडण्यास कधीही तयार झाले नसते.

 सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेमुळे भारतीय फौजेत प्रक्षोभ माजला नसता आणि मुंबईतील खलाश्यांच्या बंडामुळे देशी सैन्याची स्वामीनिष्ठा हादरली नसती तर दुसऱ्या महायुद्धानंतरही इंग्रज भारत सोडून गेले नसते. काँग्रेस, गांधीजी, नेहरू यांना स्वातंत्र्याचे श्रेय अनाठायी मिळाले.

 "मागू नका कधीही, कुणी राज्य काय दिधले?" किंवा कवी गोविंदाची 'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?" या साऱ्या विचारधारेचाच अधिक्षेप झाला

आणि देशाच्या फाळणीची किंमत देऊन नादानांनी सत्ता आपल्या पदरी पाडून घेतली.

 गांधीजींनी शूराची अहिंसा सांगितली त्याबरोबर, दंगलग्रस्त भागात फक्त जागतिक प्रसार माध्यमांचे संरक्षण घेऊन जाण्याचेही त्यांच्यात नैतिक धैर्य होते. त्यांची नैतिक भाषा आता आपल्या प्रासादाच्या कुंपणाच्या बाहेर झेड-सिक्युरिटी घेतल्या खेरीज पाऊल न टाकणारे उघडपणे वापरू लागले आहेत. सगळा देश पुरुषार्थहीन झाला; इतका की अलीकडे रॅण्ड कॉपोरेशनने भारतातील आतंकवादाचे विश्लेषण करताना "भारत हा अल कायदाचा 'सॉफ्ट टार्गेट' झाला आहे" असे स्पष्ट मांडले.

 गांधीजींचे कचकडी मानसपुत्र यांनी प्रतिअशोक बनण्याची स्वप्ने रंगवीत लायसन्स-परमिट-कोटा राज्य स्थापण्याचा उपद्व्याप केला आणि त्यातून नेता, तस्कर, गुंडा, अफसर आणि काळा बाजारवाले यांच्या हाती सत्ता सोडून दिली. शेती कनिष्ठ आणि नोकरी वरिष्ठ करून दलित, आदिवासी, मुसलमान या समाजांच्या आरक्षणवादी राजकारणाला खतपाणी घातले.

 या अशा अवस्थेत महिन्याभरात मतदार निवडणुकीच्या मतदानयंत्रासमोर जाणार आहे.

 समाजवादाचा झटका खाल्ल्यानंतर खुल्या व्यवस्थेवर निष्ठा नसणाऱ्या पुढाऱ्यांनी खुली व्यवस्था आणण्याची नौटंकी केली. जागतिक मंदीच्या पहिल्या वादळातच नेत्यांची आणि नागरिकांचीही हिंमत खचली आहे. हवामानातील बदल आणि ऊर्जेचा तुटवडा यांनी आर्थिक संकट अधिकच गडद केले आहे. समाजवादी रशियाचे पतन झाल्यानंतर अमेरिका आता एकमेव महासत्ता राहिली अशा हिशेबाने रशियन दोस्तीचा कालखंड झाकून ठेवून अमेरिकेशी दोस्ती करणाऱ्यांना एका नव्याच वादळाला तोंड द्यावे लागत आहे.

 जगातील सर्व लोकशाहीविरोधी, ग्रंथप्रामाण्यवादी, विभूतिपूजावादी आणि जगभर आपली अनिर्बंध सत्ता स्थापण्याची लालसा बाळगणारे सर्व डावे आणि इस्लामचा दुरुपयोग करणारे आणि आतंकवादाच्या छत्राखाली मादक द्रव्यांची वाहतूक करणारे यांनी क्रेमलिन नसेल तर काबूलमध्ये एक महासत्ता तयार केली आहे.

 तालिबानच्या पहिल्याच झटक्याने पाकिस्तान गुढग्यावर आला आहे. नजिकच्या भविष्यकाळात सिंध, बलुचिस्तान आदी राज्यांत पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी उठाव होणार आहेत. पाकिस्तानची शकले उडणार आहेत.

 सत्य स्थिती ही आहे की भारतापुढील भवितव्य फारसे आशादायक नाही. गांधीजींचा अजागळ वारसा चालवून अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनाचे धोरण आणि 'आम आदमी'चे अर्थकारण डाव्यांच्या मदतीने चालवणारी देशातील सत्ताधारी आघाडी पुन्हा सत्तेवर आली तर वायव्य हिंदुस्थान पाकिस्तानात जाईल, ईशान्य भारताला चीन गिळंकृत करील आणि भारतीय आपले 'ब्रह्मचर्य' सांभाळत राहतील.

 ढतसऱ्या आघाडीच्या झेंड्याखाली अनेक माजी आणि आशावादी प्रधानमंत्री निवडणूक लढवण्यासाठी एकत्र होऊ पाहत आहेत. त्यांच्या हाती सत्ता गेली तर देशात लायसन्स्-परमिट-कोटा राज्याचे पुनरुज्जीवन होईल आणि पाच वर्षात रुपया घरंगळत प्रति डॉलर ७० रुपयांपर्यंत घसरेल हे सांगायला कोण्या ज्योतिष्याचीही गरज नाही.

 एका बाजूला संयुक्त पुरोगामी आघाडीची दरी आणि दुसऱ्या बाजूला डाव्या पक्षांच्या तिसऱ्या आघाडीची खाई या पेचातून सुटण्याकरिता विकल्प म्हणून मतदारांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे आकर्षण आहे. ही आघाडी निखळ राष्ट्रवादी आहे. कायदा आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्याकरिता लागणारी शासकीय आणि प्रशासकीय कठोरता देणारे नेतृत्व या आघाडीकडे आहे. दुर्दैव असे की, निवडणूक जवळ आली की हिंदू राजांतील जुनापुराणा ऐतिहासिक भाऊबंदकीचा प्रकार या आघाडीला ग्रासतो. येत्या निवडणुकीच्या रणनीतीची घोषणा करतानाच लालकृष्ण अडवाणी रालोआचे भावी पंतप्रधान राहतील अशी घोषणा करण्यात आली. या नेमणुकीबद्दल उघड उघड बंड करण्याची कोणाची तयारी नाही. माजी उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत यांनी बंडाचा झेंडा उभारण्याचा अर्धवट प्रयत्न केला आणि मग तो नाद सोडून दिला. यामुळे, गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले. शेखावत यांचा फायदा काहीच झाला नाही, अडवाणींच्या प्रतिमेला काहीसा डाग लागला, एवढेच. त्यानंतर, ओरिसात बिजू जनता दलाशी लवकरच फाटले. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्याशीही कुरबुर चालू असल्याच्या अफवा आहेत. पंजाबमध्येही अकाली दलाशी जमवून घेणे भाजपाच्या नेत्यांना कठीण जात आहे. अलीकडे भाजपचे रणनीतितज्ज्ञ अरुण जेटली यांनी केलेला रुसवा-फुगवाही या बेबंदशाहीचेच द्योतक आहे. एका काळचे भाजपचे आधारस्तंभ कल्याणसिंग यांनीही भाजप सोडून मुलायम सिंगांच्या समाजवादी दावणीस स्वतःला बांधून घेतले आहे.

 महाराष्ट्रातही स्वतंत्र भारत पक्षाला किमान सन्मानाची वागणूक देणे भाजप व

शिवसेना यांना मोठे अवघड वाटत आहे.

 थोडक्यात, राष्ट्रापुढील भयानक प्रश्न सोडवण्यासाठी शुद्ध राष्ट्रवादी, स्पष्ट आर्थिक विचार असलेला पर्याय मतदारांसमोर नाही.

 या महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांची पार्श्वभूमी ही अशी आहे. याच अंकात संपादकांनी २००४ सालच्या निवडणुकांनंतर मी केलेल्या परिस्थितीच्या अवलोकनासंबंधीचा 'राजकीय भूमिकेचा चक्रव्यूह' हा लेख पुनर्मुद्रित केला आहे. वाचकांच्या लक्षात सहज येईल की २००४ नंतर परिस्थिती अधिकच बिघडली आहे.

 देश वाचवण्याचे ज्यांना महत्त्व वाटत नाही त्यांना या सर्वच परिस्थितीशी ना देणे, ना घेणे. स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या काळात देशभक्ती हा एक पागलपणाचा प्रकार मानला गेला. 'जय जगत्'च्या नाऱ्याखाली राष्ट्रप्रेम झाकोळून टाकण्यात आले. सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, वीर सावरकर यांच्या ज्वलंत राष्ट्रप्रेमाची ज्योत पुन्हा चेतवली तरच देश वाचू शकतो. अन्यथा, गांधीनेहरूंचे तकलादू स्वातंत्र्य, पहिले प्रजासत्ताक हे सारेच एक भयानक दुःस्वप्न पडून गेले असे समजून पुन्हा एकदा भारताच्या दुसऱ्या आणि खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यासाठी नव्याने राष्ट्रउभारणीच्या यज्ञाचे होमकुंड चेतवणारा ऋत्विज देशाला शोधावा लागेल.

(२१ मार्च २००९)

◆◆◆