'भारता'साठी/समुद्राला मीठ हरवून चालणार नाही

विकिस्रोत कडून


समुद्राला मीठ हरवून चालणार नाही


 "बाौद्ध किंवा हरिजन समाज तसेच मुसलमान हेही भारतीय जनता पक्ष, शिवसेनेप्रमाणे अत्यंत कडवे जातीयवादी आहेत आणि ते जातीयतेच्या आधारावर हिंदुधर्मियांवर आक्रमक दृष्टीने प्रचार करतात, 'हिंदू को मिटा डालो, बौद्ध धर्म लाओ' असे नारे लावत हिंदुधर्मियांच्या मोहल्ल्यांतून मिरवणुका काढतात तेव्हा शेतकरी संघटना कोणतेही आंदोलन उभं करीत नाही; आपल्या धार्माबद्दल बौद्ध किंवा मुसलमान अभिमान बाळगतात तेवढाच अभिमान हिंदूंनीही आपल्या धर्माबद्दल बाळगला तर त्यात हिंदूंचे काय चुकले?" अशा शंका विचारणारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची व हितचिंतकांची पत्रे संघटनेने जातीयवादाविरुद्ध घेतलेल्या ठाम भूमिकेच्या अनुषंगाने आली आहेत. या शंकांचे सामूहिक निरसन करण्याचा हा प्रयत्न आहे.
 स्वधर्माविषयी अभिमान बाळगणे हे आवश्यक आहे; जो स्वधर्माविषयी अभिमान बाळगत नाही त्याचा विनाश अटळ आहे.
 माझा धर्म कोणता? मी कोणत्या धर्माचा अभिमान बाळगायचा?
 "धारयति इति धर्मः।" म्हणजे, संगोपन करतो तो धर्म अशी व्याख्या धर्ममार्तंडच अनेक वेळा देतात आणि अशा धर्माचे रक्षण केले तर तो धर्म आपले रक्षण करतो- “धर्मो रक्षति रक्षितः।" असेही आग्रहाने सांगतात.
 पण, "धारयति इति धर्मः।" असे वचन आहे, "अधारयत् इति धर्मः।" असे नाही. म्हणजे, संगोपन करतो तो धर्म असे वचन आहे, ज्याने कधीकाळी भूतकाळात संगोपन केले तो धर्म असे वचन नाही.
 एके काळी जे चांगले असेल तेच आजही चांगले असेल असे थोडेच आहे?
 या विश्वाची उत्पत्ती कशी झाली, त्याचे चलनवलन कसे चालते आणि या सगळ्या व्यापाचा अर्थ काय या प्रश्नांची उत्तरे एका काळी ऋषिमुनींनी, साधुसंतांनी, पैगंबर प्रेषितांनी चिंतन, मनन करून, कठोर तपस्या करून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दिलेली उत्तरे त्या काळची परिस्थिती पाहता खरोखर अद्भूत वाटतात. आज याच प्रश्रांची उत्तरे लक्षावधी शास्त्रज्ञ अंतराळात दूरवर दृष्टी लावन आणि पदार्थमात्रांच्या खोल खोल आत शिरून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. विश्वाचे रहस्य सोडवण्याकरिता आणि समजण्याकरिता आपण कुणाचे बोट धरून चालणार? ऋषिमुनी आमचे पूर्वज होते म्हणून त्यांनी सांगितले ते मानणार काय? त्यांना मानले तर आपण खरा 'स्वधर्म' बुडवला असे होईल आणि भूतकाळातल्या एका जुन्यापुराण्या धर्माचे पालन केले असे होईल. धर्माने विश्वाची उत्पत्ती सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याआधारे समाजातील मनुष्यमात्रांना त्यांच्या दैनंदिन वागण्यासंबंधी काही नियम घालून दिले. हे नियम त्या त्या काळात, त्या त्या समाजपरिस्थितीत योग्य असतीलही, पण म्हणून आजही ते योग्य आहेत असे पक्के धरून चालणे मोठे धोक्याचे आहे.

 उदाहरणार्थ, एका काळी कदाचित काही समर्थन असलेली वर्ण आणि जाती व्यवस्था आजही आग्रहाने मानायची म्हटली तर अशा धर्मपालनाने तारण होणार नाही, मरण येईल.

 'स्वधर्म' या शब्दातील 'स्व' हे अक्षर महत्त्वाचे आहे. ज्याचा अभिमान धरावा आणि ज्यासाठी प्रसंगी प्राण ठेवण्यास तयार व्हावे असा तो स्वधर्म कोणता हे समजणे अति परिश्रमाचे काम आहे. ऐयागैयाला एवढे काबाडकष्ट व्हायचे नाहीत. त्यांच्या सोयीकरिता काही धर्मांच्या घाऊक वखारी टाकल्या आहेत. त्यातील कोणतीही एक वखार ते स्वीकारू शकतात. प्रत्यक्षात, वाडवडिलांच्या परंपरेने ज्या वखारीचे गिहाईकपण चालून आले तेथलीच गिहायकी कायम ठेवली जाते.

 मी ज्या वर्षी आंबेठाणला आलो त्या वर्षी गावात एका लग्नाच्या जेवणानंतर शेकडो लोकांना विषबाधा झाली. शिजवलेल्या भातात काही दोष होते एवढे सिद्ध झाले, पण तांदुळात तर काही दोष दिसेना. प्रयोगशाळेत शेवटी ठरले की तांदूळ शिजविल्यानंतर भात गरम आणि ताजा वाढला असता तर काही दोष झाला नसता. दोष झाला तो भात शिजवून साठवल्यामुळे. जेवणावळ मोठी असल्यामुळे कढया कढया भात शिजवून शिजलेल्या भाताचा ढीग घालत होते. या ढिगातच भातावर काही बुरशीसारखी वाढ झाली. नेहमीच्या चांगल्या तांदळात असा दोष येत नाही. जेवणावळीकरिता स्वस्तात आणलेल्या तांदळात हा दोष होता.

 धर्म हा सुद्धा ताजा आणि उनउनीत खाण्याचा पदार्थ आहे. साठवणीतला जुना धर्म हा विषारीच होय.

 माझा धर्म कोणता याच्या मी सतत शोधात आहे. हा शोध प्राण असेपर्यंत चालणार आहे. २० वर्षांपूर्वी मला जो माझा धर्म वाटत होता तो आज मला वाटत नाही. कदाचित १० वर्षानंतर, आज मला जो माझा धर्म वाटतो त्याबद्दल ममत्व राहणार नाही. प्रत्येक क्षणाचा धर्म हा अपूर्णच असतो; पण त्यावेळी त्या व्यक्तीचा जो स्वधर्म असतो त्या वेळी, त्या स्थळी त्या धर्माच्या रक्षणाकरिता सर्वस्व फेकून देण्याची तयारी असावी लागते. धर्माचे रक्षण हे असेच सतीचे वाण आहे. कोण्या एका वखारीच्या गर्वाचा झेंडा घेऊन दुसऱ्या वखारीचा तिरस्कार करणे इतके काही धर्मरक्षण सोपे नाही.

 पण माझ्या स्वत:च्या धर्मसाधनेपलीकडे मला सार्वजनिक धर्मवखारींपैकी हिंदू वखारीबद्दल काहीशी आपुलकी आहे. या आपुलकीचे कारण माझा जन्म हिंदू आईबापांच्या पोटी झाला हे नाही. जन्माच्या अपघाताने मिळालेले धर्माचे, जातीचे, भाषेच्या अहंकाराचे संस्कार प्रयत्नपूर्वक काढून टाकण्याची मी पराकाष्ठा केली आहे.

 हिंदू वखारीविषयीच्या आपुलकीचे कारण ही वखार काही चांगली आहे हेही नाही. या वखारीने भावाभावात विषमता सांगितली, बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवले, धर्मग्रंथ वाचू दिले नाहीत, देवळात जाऊ दिले नाही, गावाच्या वेशीत राहू दिले नाही, माणसाचा स्पर्श माणसाला बाटणारा ठरवला, स्त्रियांना हजारो वर्षे दुःखात पिचत ठेवले. या धर्माने कोणाची धारणा केली असेल तर ती ब्राह्मणांची किंवा इतर पुढारलेल्या जातींची. बहुसंख्य समाजाकरिता या वखारीची व्यवस्था म्हणजे रौरव नरक. इतर वखारीतही असाच कारभार नाही असे नाही. थोडक्यात, मी गुणवत्तेच्या आधाराने हिंदू वखारीबद्दल आपुलकी बाळगत नाही.

 हिंदू वखारीबद्दल आपुलकी वाटते ती त्या व्यवस्थेतील व्यापकतेबद्दल आणि सोशिकतेबद्दल. प्रत्येकाचा स्वत:चा असा स्वधर्म असतो. वेगवेगळ्या समाजाबद्दल असेच म्हणता येईल. त्यांचा त्यांचा धर्म त्यांच्या त्यांच्या प्रकृतीस आणि परिस्थितीस जुळणारा असतो. कधीकाळी कोणाला चंडिकेसमोर नवयुवतींचा बळी देणारा अघोरघंटक कपाल कुंडलांचा मार्ग परमधर्म वाटला, तर कोणाला श्वासोच्छ्वासातही अजाणतेपणीसुद्धा एखाद्या जीवाणूचीही हत्या होऊ नये इतकी परम करुणेचीही अहिंसा धर्म वाटली. हिंदू म्हणवणाऱ्या वखारीत दुसऱ्याच्या

विचाराबद्दल एक समजूतदारपणा आहे. या वखारीचा कुणी एक प्रमाणग्रंथ नाही, कुणी एक प्रेषित नाही. हा एक प्रवाह आहे - सतत बदलणारा आणि सर्व सामावून घेणारा.

 इतर वखारींचे तसे नाही. तिथले नियम फार कडक. हा एक ग्रंथ, त्यात हजार दोन हजार वर्षांपूर्वी जे लिहिले असेल तेच काय ते सत्य; अमक्या महात्म्याने, प्रेषिताने जे काय सांगितले असेल तेच सत्य. या धर्मांनी अशी असहिष्णुता शिकविली आहे असे नाही; पण व्यवहारात परिस्थितीनुरूप अशी असहिष्णुता इतर वखारीत बोकाळली आहे.

 बौद्ध म्हणा, मुसलमान म्हणा हिंदूना डिवचण्याचा, खिजवण्याचा प्रयत्न करतात हे कदाचित संकुचित आणि मर्यादित धर्म-संकल्पनेशी सुसंगतही असेल; पण स्वतःला हिंदू म्हणविणारा समाजही इतरांना चिडविण्याचे, डिवचण्याचे काम सतत करतच असतो. किंबहुना, अशा डिवचण्यासाठी त्याला काही करावेच लागत नाही.

 बौद्ध म्हणा, मुसलमान म्हणा एक दलित तर दुसरा दलितातील दलित. आर्थिक, सामाजिक, राजकीय - सर्वच क्षेत्रांत मागे पडलेले. आसपासच्या बहुसंख्य समाजाविषयी त्यांच्या मनात रोष आहेच. तो रोष दाखवण्याला त्यांच्याकडे साधने काय? शाळेतल्या पोरांना एखाद्या बलदंडाचा जाच होतो, त्याला उपाय काहीच करता येत नाही. मग ती पोरं चिडवाचिडवीचा प्रकार सुरू करतात. जातिव्यवस्थेवर आधारलेली आपली समाजरचना हा एक सततचा जाच आहे. बौद्धांनाही आहे, मुसलमानांनाही आहे आणि हिंदू समाजातील बहुसंख्य लोकांनाही आहे. ज्याला बलुतेदारी आणि हुन्नर बुडून गेली आहे, ज्याची नोकरी मिळण्याची काही आशा नाही अशा कुणालाही ही समाजव्यवस्था जाचाचीच वाटणार.

 मग, या जाचाबद्दल त्यांनी ओरडायचे कसे? हे दुःख व्यक्त करण्याकरिता बौद्ध आणि मुसलमान झेंड्याचा उपयोग मोठा सोयीस्कर असतो.

 पण, म्हणून हिंदू वखारीने आपला बहुमूल्य पंचप्राण सहिष्णुताच सोडून दिली तर त्या वखारीत वाखाणण्यासारखे काहीच राहणार नाही. हिंदुत्वाचा झेंडा विवेकानंदांनी फडकवला, सावरकरांनीही पुढे नेला. हिंदू धर्मातल्या चांगल्या गोष्टींना उजाळा देत आणि वाईट गोष्टी दूर करीत त्यांनी हे काम केले. हिंदुत्वाचे आधुनिक पुरस्कर्ते हिंदू समाजातही इतर समाजातील असहिष्णुता आणि संकुचितपणा वाणवण्यात धन्यता मानत आहेत. मला चिंता आहे ती ही की,

हिंदू सहिष्णुता संपली तर पुन्हा सहिष्णुता उत्पन्न करायची कोठून? समुद्राने खरटपणा सोडला तर मीठ आणायचे कोठून?

 हिंदू वखारीची श्रेष्ठता ही काही उखाळ्यापाखाळ्यांत वरचढ ठरून होणार नाही; दंगे, मारामाऱ्या करूनही हे साध्य होणार नाही. सगळ्या मशिदी पाडल्या आणि त्या जागी देवळे बांधली तरी हे सिद्ध होणार नाही. हिंदू समाजाने आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी स्वतःच्याच रणभूमीवर राहिले पाहिजे; इतर संकुचित चिखलदऱ्यांत उतरता कामा नये. ज्या दिवशी सहिष्णुतेचे उपासक असहिष्णु बनतील आणि विटेला वीट, दगडाला दगड असे उत्तर देऊ लागतील त्या दिवशी सहिष्णुतेचा पराभव स्वयंसिद्धच असेल. हिंदुत्ववादी जिंकतील; पण हिंदुत्वाचा पराभव झाला असेल. हिंदू शब्दाबद्दल ज्यांना ज्यांना अभिमान असेल, त्या धर्माचे रक्षण करावे अशी तळमळ असेल त्यांनी काम केले पाहिजे; गुंड पुंड मौलागिरी नाही. आपली समाजव्यवस्था ही श्रेष्ठ आहे, कार्यक्षम आहे असे दाखवून दिले पाहिजे. या व्यवस्थेत कुणी एक दुसऱ्याच्या कष्टावर जगत नाही, येथे अबलांवर अत्याचार होत नाही, माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी आहे अशी व्यवस्था झाली तर तिचा पराभव कोण करू शकेल?

 आपल्या मनातील खरी कळकळ काय आहे? हिंदुत्वाच्या नालायक वारसदारांना मोठे सिद्ध करणे ही आहे की हिंदुत्वाचा आत्मा जोपासणे ही आहे? या प्रश्नाचे जे उत्तर त्याप्रमाणे तुमचा मार्ग ठरेल.

 तुमच्या प्रश्नाला उत्तर कदाचित मिळालेले नाही असे तुम्हाला वाटले तर पुन्हा एकदा हे वाचून पाहा. हिंदुत्वाच्या आत्म्याच्या तुम्ही जवळ असाल, कुडीच्या नाही, तर तुम्हाला शेतकरी संघटनेची भूमिका पटल्याशिवाय राहाणार नाही.

(६ जून १९९१)

♦♦