'भारता'साठी/किल्लारीचे पाप राजाचे

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to searchकिल्लारीचे पाप राजाचे


 समानी सुलतानी
 स्वित्झर्लंडमध्ये राहत असताना एका गोष्टीची सतत टोचणी असे. १९७० सालचे पूर्व बंगालमधील महापूरग्रस्त, मग १९७१ मधील बांगलादेशचे निर्वासित, त्यानंतर हिंदुस्थानातील १९७२ चे दुष्काळग्रस्त. एक ना एक नैसर्गिक आपत्ती, तिचे लक्षावधी बळी आणि त्यांची हीनदीन अवस्था यांच्या बातम्या वर्तमानपत्रांत. रेडिओवर, टेलिव्हिजनवर सतत येत. अस्मानी संकटाच्या बातम्या नसल्या तर याह्याखान, इदी अमीन इत्यादी सुलतानांच्या क्रूर कहाण्या! अगदी स्वित्झर्लंडसारख्या देशात, संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयातही, कोणीही कितीही समानतेचे नाटक केले तरी आम्हा गरीब देशातल्या अधिकाऱ्यांकडे बाकीचे सगळे काहीशा दयेच्या आणि करुणेच्या भावनेने पाहत.
 कोणी आपल्यावर करुणा दाखवावी ही मोठी दाहक संवेदना आहे. अशावेळी मनात काही काळ का होईना विचार येऊन जाई, या श्रीमंत देशावर महापूर, भूकंप, ज्यालामुखी असे एक तरी संकट कोसळावे, हजारो माणसे निराधार व्हावीत म्हणजे त्यांना करुणा दाखवण्याची एखादी तरी संधी आपल्याला मिळेल; पण असे कधीच झाले नाही.
 संकटांची गरिबी
 एकदा स्वित्झर्लंडमध्ये भर उन्हाळ्यात तीन आठवडे पाऊस पडला नाही. सगळ्या माध्यमांतून धोक्याच्या सूचना खणखणू लागल्या, "जंगलाजंगलातील गवत सुकेसुके, कोरडे झाले आहे; आगीचा धोका आहे. सिगारेटचे थोटूक प्रवासात इकडे-तिकडे टाकू नका."
 आणखी एकदा आल्पसमधील एक शिखर सर करण्यासाठी आठ लोकांची टोळी गेली होती. बर्फाच्या वर्षावामुळे ती अडकून पडली. त्यांना सोडविण्याकरिता तासाभरात हेलिकॉप्टरे अपघातस्थळी जाऊन पोहोचली. अडकलेल्या निर्यारोहकांच्या सुटकेचा सारा प्रचंड खटाटोप घरोघर लोकांनी टेलिव्हिजनवर प्रत्यक्ष पाहिला.
 लष्करी सुरुंग पेरण्याच्या प्रदेशात एक छोटेसे कुत्र्याचे पिल्लू चुकून शिरले तर त्याच्या सुटकेच्या प्रयत्नांवर सगळ्या देशाचे लक्ष वेधले गेले. माझ्या दशकभरच्या निवासात स्वित्झर्लंडवर कोसळलेली संकटे ही एवढीच. श्रीमंत देशात संकटांचा महाभयंकर दुष्काळ!
 निसर्ग त्या देशांवर बहाल आहे म्हणावे तर तेही खरे नाही. स्वित्झर्लंडमध्ये बहुतेक भागात दरवर्षी निम्मा वेळतरी बर्फ पडतच असतो. त्याच्या तुलनेने हिमपात पुष्कळ कमी असला तरी उत्तरकाशी प्रदेशात बद्रीनाथची देवळे बंद होऊन पुजाऱ्यासकट सगळे जोशीमठपर्यंत परत येतात; पण स्वित्झर्लंडसारखे देश असल्या वर्षावांना न जुमानता काम करीत राहतात. एवढेच नव्हे तर बर्फ पडू लागल्यानंतर डोंगर डोंगर बर्फाच्छादित घसरणीवरून वेगवेगळे खेळ खेळणाऱ्या खेळाडूंच्या जत्रांनी भरून जातात.
 न येणाऱ्या संकटांचा सामना
 योगायोगाने बर्न शहरातील एका नागरी सुरक्षेच्या केंद्रास भेट देण्याची संधी मिळाली. बर्नची लोकसंख्या त्यावेळी लाखाच्या आसपास होती. आजही तेवढीच असेल. स्वित्झर्लंड हा संपूर्ण शांततेचा आणि तटस्थतेचा देश. दोन्ही महायुद्धांतसुद्धा ही तटस्थता अबाधित राहिली. या तटस्थ, शांतताप्रिय देशातील प्रत्येक पुरुष लष्करातील सैनिक आहे हे मला ठाऊक होते. कधीकाळी कोणा शत्रूचे आक्रमण झालेच तर त्याला रोखण्यासाठी महामार्गांचे पट्टेच्या पट्टे बाजूला काढण्याची व्यवस्था आहे असे मी ऐकले होते. महामार्गाचा वापर लष्करी विमानांसाठी धावपट्टीसारखा करण्याची योजना आहे; अशी कुजबूज होती. शांतिदूत स्वित्झर्लंडच्या लष्करी तयारीच्या सगळ्या कथा ऐकूनदेखील डोळ्यांनी जे प्रत्यक्ष पाहिले त्यावर विश्वास बसेना. बर्नच्या एक लाख लोकवस्तीसाठी ३०,००० लोकांना पुरेल असा सुरक्षा निवारा जमिनीखाली १०० मीटर इतक्या खोलीवर एका प्रचंड बोगद्यात केला होता. एखादा अणुबाँब या बोगद्याच्या डोक्यावरच पडला तर गोष्ट वेगळी; अन्यथा आश्रयस्थान अगदी पक्के सुरक्षित. सगळ्या जागेत, जमिनीच्या इतक्या खोलीवरही हवा खेळती राहण्याची व्यवस्था. ३०,००० लोकांकरिता झोपण्याची व्यवस्था थ्री टियर शयनयानातल्यासारखी केलेली, त्यातील हजारएक बिछाने स्वच्छ पलंगपोस, ब्लँकेट घालून सदा तयार ठेवलेले. कोणत्याही संकटकाळी एक सेकंदाचासुद्धा विलंब न लागता ही यंत्रणा मदत देण्याकरिता सज्ज होती. ३०,००० लोकांच्या सात दिवसांच्या जेवणखाणासाठी लागणारा माल तेथील शीतगृहात कायमचा साठवलेला असतो. दर आठ दिवसांनी साठा बदलण्यात येतो. एका वेळी २० लोकांवर शस्त्रक्रिया करता येतील इतके मोठे सुसज्ज हॉस्पिटल कायम चकचकीत अवस्थेत तयार असते. कोठे संकट आले तर सगळी तयारी सुसज्जपणे वाट पाहते आहे. त्याचा उपयोग करण्याची वेळ कधी येत नाही. तरीही यंत्रणेच्या सुसज्जतेत तसूमात्र ढिलाई होत नाही. माणसाच्या एवढ्या जय्यत तयारीपुढे निसर्गही मान तुकवतो. या उलट, आमच्याकडे आसमानी संकटाच्या एका फटक्यात हजारो माणसे गारद होतात, लक्षावधी जखमी होतात आणि कोट्यवधी निराधार होतात. सारांश, आपत्ती निसर्गाच्या अतिरेकाची नसते; ती असते माणसाच्या दुर्बलतेची.
 संकटी सदा बेसावध
 किल्लारी-सास्तूर भूकंपाला मुख्यमंत्री शरद पवार यांनी भूमातेचा कोप म्हटले; पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी 'अस्मानी संकट' असा शब्द वापरला. त्यांच्या युक्तीवादाचा मतितार्थ, "आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना." हजारो लोक आपल्याच घराच्या भिंतींच्या, दगडमातीच्या ढिगाखाली चेंगरून मेले ही सगळी देवाजीची इच्छा! यात शासनाचा दोष काही नाही. आम्ही आता मदत म्हणून जे काही काम करण्यासारखे आहे ते करतोच आहोत. निवडणुकीच्यावेळी राग नसावा!
 बिहारमध्ये भूकंप झाला; हजारो माणसे मेली. गांधीजींनी म्हटले होते, "देशातल्या अस्पृश्यतेच्या चालीच्या पापाबद्दल मिळालेले हे प्रायश्चित्त आहे." पंतप्रधान लातूरच्या भेटीला आले, त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला, "मग, किल्लारीच्या भूकंपाचे पाप कोणाचे?" पंतप्रधानांचे उत्तर, "याचा विचार ज्याने त्याने आपल्या मनात करावा." म्हणजे दस्तूरखुद्द पंतप्रधानांना आत्मनिरीक्षणाची गरज नाही.
 बळीराजाचाच बळी
 एखाद्या वर्षी चांगला पाऊस पडला तर सारी दुनिया खुश होते; पण पाऊस पडला नाही तर त्यामुळे बिगर शेतकरी समाजाच्या आयुष्याला थोडासुद्धा धक्का लागत नाही. धान्याचा एक दाणाही न पिकवणाऱ्यांचा गुजारा व्यवस्थित होतो आणि धान्य पिकवणारे शेतकरी मात्र पोटाला भाकरी मिळावी म्हणून बेघर होऊन खडी फोडायच्या केंद्रावर हात फोडून घ्यायला जातात.
 दुष्काळाची कथा, तीच भूकंपाची. किल्लारी-सास्तूरच्या भूकंपात बळी कोण पडले? गावाच्या बाहेरील पालांत आणि झोपड्यांत राहणारे लमाण्यांचे तांडे सुरक्षित राहिले. बळी पडले ते 'शेतकरी आर्किटेक्चर'च्या घरात राहाणारे, म्हणजे दगडगोटे काळ्या-पांढऱ्या मातीच्या गारांत घालून ज्यांनी आपले घर उभे केले तेच गाडले गेले. दुष्काळाचे बळी जसे निवडून शेतकरी समाजाचे तसेच धरणीकंपाचे बळीही.
 इंद्रदेव काय आणि धरणीमाता काय, त्यांच्या कोपाचा त्रास फक्त एका विवक्षित समाजालाच होत असेल तर त्याला अस्मानी संकट म्हणणे खोटेपणाचे आहे. या संकटाची तोशीस आपल्याला फारशी लागू नये याकरिता बाकीच्या साऱ्या समाजांनी काहीना काही तरतूद केली आहे. घसरणीला लागलेला शेतीचा धंदा सावरता सावरता नाकीनऊ आलेल्या शेतकऱ्यांना अशी काही तरतूद करता येत नाही. अगदी सुबत्तेच्या वर्षातही धान्याधुन्याची कणगी भरता येत नाही. मग घरशेतीची डागडुजी दूरच राहिली. प्रत्येक संकटांचे बळी तेच होतात ते याच कारणाने.
 सगळ्या समाजाचा जत्था जंगलातून चालला आहे. जत्थ्याच्या मध्यभागी पुढारी, नोकरदार, कारखानदार इत्यादी भाग्यवान वर्ग आणि जत्थ्याच्या चारी बाजूस जाड थर शेतकरी माणसांचा. जंगलात लांडग्या-कोल्ह्यांची धाड आली तर लचके तोडले जाणार ते शेतकरी समाजाचेच. मध्यभागीचे भाग्यवान सुरक्षित! अशी ही व्यवस्था आहे. अमरावती जिल्ह्यातील कुपोषणाचे बळी काय आणि लातूर-उस्मानाबादचे भूकंप बळी काय दोन्हीही अर्थव्यवस्थेने केलेल्या कत्तलीच आहेत.
 गरिबीचे मोजमाप
 गरिबी हटवायची घोषणा 'फॅशनेबल' झाल्यापासून गरीब म्हणजे नेमके कोण, त्यांची व्याख्या करण्याकरिता कोट्यवधी रुपये, कागद-शाई आणि अर्थशास्त्रांचे श्रम खर्ची पडले आहेत. गरीब कोण तर ज्यांचे उत्पन्न अमुक अमुक रुपयांपेक्षा कमी आहे ते. किंवा ज्यांच्या आहारात उष्मांक किंवा प्रथिने यांचे प्रमाण एका मयादेपेक्षा कमी असते ते. अशा धर्तीच्या व्याख्या विद्वान शास्त्रज्ञांनी दिल्या. आपापल्या व्याख्येच्या समर्थनासाठी ते अभिनिवेशाने झुंजले आणि विद्वान म्हणून मान्यता पावले.
 खरी कसोटी अपघाताची
 खाण्यापिण्याच्या आधाराने जीवनस्तर ठरवणे कोंबड्यांच्याच बाबतीत किंवा दुभत्या जनावरांच्या बाबतीत कदाचित योग्य असेल; मला त्याबद्दलही शंका आहे; पण ही असली मोजमापाची पद्धत मनुष्यप्राण्याला लागू करणे अगदीच हास्यास्पद आहे. माणसाचे शरीर हा एक मोठा चमत्कार आहे. वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरे जाऊन आपल्या दैनंदिन जीवनातील नित्यनियमाच्या गरजा भागवण्याचे त्यांचे सामर्थ्य विलक्षण आहे. शरीराच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पंचपक्वान्नांचा आहार काय आणि झुणकाभाकरीचा आहार काय, फारसा फरक पडत नाही; पण काही अनपेक्षित घडले तर मेवामिठाई खाणारा तगून जाताना दिसतो ते त्याच्या श्रेष्ठ खाद्यामुळे नव्हे, तर खाद्याच्या अनुषंगाने येणाऱ्या इतर कवचकुंडलांमुळे. गरिबीचे मोजमाप उष्मांकांत करून चालणार नाही. अनपेक्षित, अगदी असंभाव्य अपघातांना सामोरे जाण्याचे माणसाचे सामर्थ्य किती या फूटपट्टीने गरीबी, श्रीमंती मोजणे योग्य होईल.
 एका श्रीमंतीच्या टोकाला, प्रत्यक्ष अणुबाँब पडला तरी निर्धास्तपणे जगून राहतील असे बर्नचे लोक, तर दुसऱ्या टोकाला किरकोळ भूकंपाच्या धक्क्यामुळे आपल्याच घराच्या दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले जाणारे किल्लारी-सास्तूरचे शेतकरी आणि त्यांचे देशभरच्या गावागावात पसरलेले भाईबंद. भाईबंद शेतकऱ्यांचा भूकंप अजून यायचा आहे म्हणून ते सारे जिवंत आहेत. ते जिवंत असल्याचे श्रेय कोणी घेऊ शकत नाही, त्यांच्या अपमृत्यूचे पाप मात्र व्यवस्थेचे म्हणजे राजाचे आहे.

(२१ ऑक्टोबर १९९३)

♦♦