पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
संतति-नियमन

मुले होणे इष्ट नसतें. प्रजोत्पादनाच्या हेतूनें केलेला संभोगच प्रशस्त होय व त्या हेतूव्यतिरिक्त केलेला संभोग निषिद्ध व निंद्य होय ही प्राचीनकाळची कल्पना त्या काळीं ठीक होती. कारण साधारणपर्णे एका स्त्रीस एका पतीपासून किती मुलें होतात त्याचें मध्यप्रमाण पाहिले तर तें आठ किंवा नऊ असें असतें; व तो काळ असा होता कीं प्रत्येक कुटुंबांत आठ नऊ मुलें झालीं तर हरकत नव्हती, इतकेंच नव्हे तर तें समाजाच्या हिताचेंच होतें. म्हणजे आपल्या संभोगेच्छेवर विशेष बंधन घालण्याचा प्रसंग त्या काळांतील स्त्री-पुरुषांवर येतच नसेल असें म्हणावयास हरकत दिसत नाहीं. आठ नऊ अपत्यांपलीकडे स्त्रीच्या प्रसवितेची कमालमर्यादा पोचतच नसल्यामुळें व तितक्या अपत्यांस अवकाश असल्यामुळे संभोगलालसेचा निरोध करण्याची गरज त्या काळांतील स्त्री-पुरुषांना कधीं भासली असेल असें वाटत नाहीं. उलट आजच्या परिस्थितींत तीन अपत्यांपेक्षां अधिक भार सहन करण्याची आर्थिक ताकद कोणत्याही कुटुंबांत नसते; आणि स्त्रीची प्रसविता तर या मर्यादेवर थांबणें शक्य नसतें. याचा उघड अर्थ असा होतो कीं, स्त्री तिहींपेक्षां अधिक वेळां गरोदर होतां कामा नये. या धोरणास अनुसरून गर्भप्रतिबंध करण्याचें सामर्थ्य ब्रह्मचर्यव्रतांत असले तरच त्या व्रताचा मार्ग सामान्य जनांस दाखवून देणें सूज्ञपणाचें होईल. कांहीं विशिष्ट रात्रीं संभोग न केल्यास गर्भधारणा टळते या कल्पनेस आधुनिक शास्त्राचा आधार आहे कीं काय हें आपल्याला पाहिलें पाहिजे. स्त्रीच्या एका ऋतुस्नानापासून दुसऱ्या ऋतुस्नाना- पर्यंत अमुक एक काल असा असतो, की त्या कालांत तिच्याशीं पुरुषसमागम घडला तरी गर्भधारणा होणेंच शक्य नसतें अशी एक सामान्य समजूत आहे व तिला वैद्यक ग्रंथांतील वचनांचा आधारही मिळतो. ही कल्पना जर खरी असली आणि स्त्रीच्या प्रतिमासिक अवस्थेत गर्भप्रतिबंधक असा जर एक 'सुरक्षित काल' खरोखरीच