पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संततिनियमनासाठी ब्रह्मचर्य

४५

विवाहित स्थितींत प्रजोत्पादनासाठी वीर्यव्यय केलाच पाहिजे आणि स्त्री-पुरुषसंयोग ही मुळीं विवाहाची क्रमप्राप्त परिणतिच आहे, वगैरे गोष्टी जरी खऱ्या असल्या, तरी विवाहित स्त्री-पुरुषांनी देखील संभोगसुख नियमित प्रमाणांतच उपभोगिलें पाहिजे. म्हणजे समाजाच्या कल्याणासाठीं सुप्रजाजनाचें कार्य केल्याचे श्रेय त्यांस मिळूनच्या मिळून स्वतःच्या दीर्घायुष्याचेंही त्यांस जतन करतां येईल. या दृष्टीनेच गृहस्थाश्रमांतही ब्रह्मचर्याचें महत्त्व अतिशय आहे असें आमचे शास्त्रकार सांगतात, आणि विवाहित स्त्री-पुरुषांनीं ब्रह्मचर्य व्रताचें परिपालन केल्यास त्यांचा गृहस्थाश्रम योग्य रीतीने व्हावा तसा होऊन त्यांना स्वतःला पूर्णायुष्याचा लाभ होतो असें त्यांचे आश्वासन आहे. सारांश, ब्रह्मचर्य हैं एक आदरणीय व आचरणीय त असून त्याचा सर्व स्त्री-पुरुषांना उपदेश केल्यास समाजाचें कोणत्याही प्रकारचें अहित होण्याची भीति नसून उलट त्यापासून समाजाचें कल्याणच होईल. तेव्हा अल्पप्रसवितेचे ध्येय साधण्यासाठी याच मार्गाचें अवलंबन करावयास लोकांना सांगितले पाहिजे.
 पण ब्रह्मचर्याचें व्रत अतिशय हितपरिणामी आहे हें खरें असले तरी संततिनियमनाचें एक उत्कृष्ट साधन म्हणून त्याचा पुरस्कार करण्यापूर्वी एका प्रश्नाचा निकाल लावला पाहिजे. संततिनियमन साध्य करावयाचें याचा अर्थ उघडच असा की स्त्रियांना संतति कमी झाली पाहिजे. आपल्याला जितक्या मुलांचे पालन पोषण व शिक्षण उत्तम प्रकारें करतां येईल तितकींच मुलें आपल्याला होतील, त्यापेक्षां अधिक होणार नाहींत अशा धोरणानें प्रत्येक कुटुंबांतील पतिपत्नींनी वागावयाचे हाच संततिनियमनाचा खरा खरा अर्थ होय. आतां मध्यम स्थिती. तील लोकांची आर्थिक परिस्थिति पाहिली तर साधारणपणें असें म्हणतां येईल, कीं त्या स्थितीतील कुटुंबास तीन मुलांपेक्षां अधिक