पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : २२७

करावी, कापुसाच्या वाती जाळाव्या. त्याप्रमाणे अज्ञान बायका करतात. हे वेड त्यांस भट लावितात.
 हे सर्व यांनी सोडून दिल्याखेरीज याची बरी गत मला दिसत नाही. मग ईश्वराची इच्छा.

♦ ♦


ब्राह्मणांची शिक्षणपद्धती

पत्र नंबर ६२ : ३ जून १८४९

 सांप्रत ब्राह्मण लोक हे काही उपयोगी नाहीतसे झाले आहेत. याचे कारण त्यांस सरकारी काम सांगितले, तर लाच खातात; लोकांस उपद्रव करतात व आपले जातीचा अभिमान धरतात. येणेकरून महार, चांभार इत्यादि जातीस त्यांचे पुढे येण्यास देखील योग्यता नाही, असे म्हणतात.
 तस्मात् यांनी भिक्षा मागून वनात रहावे, हेच काम यास चांगले योजिले होते; परंतु ते सोडून या गृहस्थीपणात, सरदारीत व कारकुनापणात यास कोणी बोलाविले बरे ? यांचे वाचून अडले होते काय ? ते आपले संतोषाने दुसरे व्यापार करू लागले. तेव्हा आता त्यांस हे योग्य आहे की, त्यांनी आपल्यास व दुसऱ्यास सारखे मानावे, हे खरे. ब्राह्मण लोक अनिवार झाले आहेत व मूर्ख आहेत. याचे कारण त्यांस सुशिक्षा नाही. ब्राह्मणाचा मुलगा सातआठ वर्षांचा झाला, म्हणजे त्यांची मुंज करतात. नंतर भट व पंतोजी यांचे स्वाधीन होतो. आणि त्यांस ज्ञान, उपदेश किंवा कला-कौशल्य-विद्या हे काही एक शिकवीत नाहीत, ईश्वराचे भय व आपला वास्तविक धर्म त्याचे मनात कशाने येईल ?
 श्रीमंताचे पोर असले तर भट त्यांस वेद शिकवितात व तो फक्त पाठ करवितात. मग तो मुलगा जसा त्याचा गुरू टोणपा, तसा त्याचा शिष्य टोणपा होतो. बरे, ब्राह्मणास ज्या रीतीने वेद शिकवितात, त्याचा काही तरी उपयोग आहे? फक्त अक्षरे तोंडाने उरात रक्त पडे तोपर्यंत घोकून पाठ करतात. त्यापेक्षा दगड फोडावयाची मजुरी का सांगत नाहीत ? अक्षर मराठी झाले, म्हणजे मुलगा शहाणा झाला. बाप म्हणतो माझा मुलगा रुद्र पाठ म्हणतो, पवमान पाठ म्हणतो.