पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२६ : शतपत्रे

की त्याविषयी ग्रंथ नाही. शौच्यविधीवरदेखील एक ग्रंथ आहे. त्यात मनुष्यांनी शौच्य कसा करावा, हेच लिहिले आहे. वास्तविक पहा बरे, याचा काही उपयोग आहे काय ? कशाला भट या संस्काराच्या कंठाळभर पोथ्या बाळगतात ? यात काय आहे ? याचा काय उपयोग ? लोकांचे सुख व ज्ञान वाढवावयाची त्यात एक देखील गोष्ट नाही. मूर्खपणा वाढवावयाच्या गोष्टी आहेत. त्या ग्रंथांनी वेड लावले एवढे मात्र झाले.
 अज्ञान्यास अजरामर करण्याकरिता या पोथ्या लिहिल्या आहेत, असे मला वाटते व त्यांची फजिती होऊ नये, म्हणून त्या गुप्त ठेवितात. कोणी सोडू नयेत व कोणी भलत्यानेच वाचू नयेत म्हणतात, याचे कारण हेच. जर त्यात खरे ज्ञान असते, तर कोणीही वाचले तरी चिंता काय ? परंतु ग्रंथ लिहिणारांची खात्री होती की हे गुप्त ठेवले, तर त्यांचे माहात्म्य राहील. हे भुसाचे लाडू आहेत. हे त्यांस माहीत होते. याप्रमाणे हे भट वेडे झाले आहेत. मनुष्य काही उद्योग करील किंवा विचार करील, तर त्यांस त्या भटाचे संगतीने वेळ सापडावयाचा नाही.
 हल्ली कर्नाटकांतील एक सरदार याजकडे पाहिले; म्हणजे समजते की, त्याचा वेळ हातपाय धुण्यात जातो. दिवसातून दोनशे वेळ पाय धुतो. पाचशे वेळ चूळ भरतो ! यास हे काय वेड किंवा शहाणपण आहे ?
 तसेच बाजीरावाकडे पहा. हा पुरुष मराठ्यांचे राज्यास बुडविण्यास कारण झाला. असे का झाले, याविषयी विचार केला तर इतकेच दिसते की, यास जन्मापासून नाना फडणिसाने कोपरगावी भटाचे शाळेत ठेवला होता. म्हणून मोठेपणी केवळ भटच निपजला. याच्या राजकीय गुणाचे अंकुर जळून गेले. याप्रमाणे पूर्वीचे पेशवे भटाचे शाळेत नव्हते. कोणी असे म्हणतात की, राज्यास अयोग्य व्हावा, म्हणून नाना फडणिसाने त्यांस बुद्धया भट केला; परंतु तोच राज्यावर आला, हे देशाचे प्रारब्ध. अस्तु. त्यांस वेड लागले. त्याने राज्य केव्हा करावे, कारभार केव्हा करावा आणि हे नित्य कर्म केव्हा करावे, हे जाणले नाही.
 आणि या कर्माचा फायदा काय ? जोपर्यंत निर्मळ वाटे, तोपर्यंत कोणीही हात धुतोच आहे. त्यांस अमुक वेळ हात धू, म्हणून सांगावयास कशाला पाहिजे ? परंतु इतक्या मूर्खपणाच्या गोष्टीस ब्राह्मण मात्र मान देतात. आणि कोणी उपास, कोणी व्रते, कोणी अनुष्ठान, असे सगळा दिवसभर करतात. ज्याजवळ पैसा त्यांस भट घेरतात आणि हा उपदेश करतात; आणि पुराणिकबाबास घेरतात व वेड लावतात. कोणी सांगतो, आवळीचे झाडाखाली जावे, पूजा