पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२८ : शतपत्रे

आणि भटाच्या तोंडच्या मूर्खपणाच्या गोष्टी ऐकतो. तो असा दृढमूर्ख होतो की, त्याचे मनात जे येते, ते मोठे दृढ होते; कदापि निघत नाही.
 त्यास वाटते पृथ्वी शेषावर आहे. ग्रहणात राहू चंद्रास खातो. हिंदुस्थानाएवढीच पृथ्वी. पलीकडे गतीच नाही. ब्राह्मण सर्व जगात श्रेष्ठ, भूदेव. जितक्या विद्या आहेत, त्या सर्व शास्त्रात आणि पुराणात आहेत. त्याखेरीज काही नाही. वेदाचा अर्थ करू नये. पुराण, शास्त्र ब्राह्मणाखेरीज कोणी वाचू नये. परदेशास गेले, तर भ्रष्ट होतो. अशा नाना प्रकारच्या समजुती त्यांच्या पडून ते शतमूर्ख होतात.
 अशी थोर श्रीमंतांची मुले पुण्यात मला शेकडो आढळतात व मोठाले वयोवृद्ध कित्येक आहेत, त्यांची तर संख्याच नाही. वर्तमानपत्रे व बुके या द्वाराने ज्ञान मिळविणे, हे तर त्यांचे कुळाचे शत्रू वाचणे व लिहिणे त्यांचे बापाचे वैरी, असे लोक आहेत. यास ईश्वर कोणत्या रीतीने ताळ्यावर आणील ते आणो. ईश्वराने ब्राह्मणांचा गर्व हरण करावयास दरिद्रांजन योजिले आहे. तरी त्यांचे डोळे अजून उघडत नाहीत. शास्त्र पुराणे घेऊन बसतात. पुराणात मूर्खपणा भरला आहे व ती फक्त ब्राह्मणास लाभ होण्याकरिता केली आहेत. यास्तव मला वाटते की; ब्राह्मणांची मुंज झाली, म्हणजे त्यांस विद्या पढवावी. काही चांगले ग्रंथ नवीन पद्धतीचे करून त्यात नीती व ईश्वराचा भजनाचा गोष्टी घालून व इतर भूगोल, खगोल इत्यादि वास्तविक आहेत, तशा गोष्टी लिहून ते ग्रंथ पढवीत जावे. म्हणजे मूर्खपणा जाऊन तो मुलगा चांगला तयार होईल. असे ग्रंथ कोणी तरी केले पाहिजेत.
 नाही तर लोक सांप्रत काळचा शिक्षेचे रीतीने फारच मूर्ख होतील. शास्त्री, पंडित आणि त्यांस होय होय म्हणणारे गृहस्थ, हे काय बोलतात ते देखील त्यांस कळत नाही. कोणी सांगतो की, सप्त समुद्र आहेत. कोणी म्हणतो मेरु मध्ये आहे. कोणी म्हणतो, सात समुद्र रथाचा चाकांनी पाडले. कोणी म्हणतो अगस्ति मुतला. याचे तोंडास कोणी हात लावावा ? असे बोलणे ऐकून मला वाटते की, हे इस्पितळातले वेडे आहेत काय ? कोणी म्हणतो, हे इंग्रज जलचर (पाण्यातले राहणारे) आहेत. कोणी म्हणतो, ते वानर आहेत. कोणी म्हणतो त्यांस रामाचा वर आहे. तेव्हा माझे मनात येते की, तुम्ही बोलता हे डुकर आहा !
 शेकडो लोक संभावित, सरकारचे चाकर, मोठे कामावर आहेत, पण त्यांस शपथ जर घातली की, तुम्ही आपले कामाशिवाय कधी काही ग्रंथ किंवा काही वाचले होते काय ? तर ते गंगाजल हातात घेऊन सांगतील की,