पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : २२५

गणपतिपुराण अशी लिहिली. प्रत्येकात त्यांचा हेतू इतकाच होता की, एखाद्या देवाचे वर्णन करून ईश्वर त्यात आणून ठेवून ब्राह्मणास पैसा मिळण्याची तजवीज पहावी.
 तशीच व्रतमाहात्म्ये. कोणी म्हणाला सोमवारी उपास करावा, कोणी म्हणाला मंगळवारी, कोणी शनिवारी. दर एकाची कथा व त्याची देवता आणि त्याचप्रमाणे अमक्याने केले आणि त्याचे अमुक कार्य झाले व तसे जो करील, त्याचे तसेच होईल, म्हणून लिहिले; पण हे सर्व कवीचे लाघव आणि ब्राह्मणाचे कार्य करावयाची तजवीज आहे, असे उघड दिसते व याचा खोटेपणा उघड दिसतो. वर्षात तीनशे साठ दिवस व त्याहून अधिक व्रते आहेत. तसेच दर एक पुराणात दर एक देवाचे वर्णन, त्याचे नाव, अमके दैत्य त्याने मारले तो ईश्वर, त्यांस भजावे, इतरास भजले तर नरकाचे साधन, याप्रमाणे लागलाच शेरा, असे दर एकात आहे. दर एकात सृष्टीची उत्पत्ती, देवाचे चरित्र व भविष्ये याप्रमाणे सर्व तयारी केली आहे. तेव्हा कोणते देवास भजावे, कोणती व्रते करावी किंवा तीनशे साठही दिवस व्रते करावी ?
 धर्मशास्त्र पाहिले तर तो पर्याय काही वेगळाच आहे. वेद पाहिला तर त्यात काही वेगळेच आहे. वेदात अवतार आणि नाना प्रकारच्या देवता आणि व्रते हे काही नाही. फक्त होमाशी कारण आहे. याचा मेध, त्याचा मेध हे सर्व त्यात आहे. तेव्हा वेदशास्त्र व पुराणे यांचा धर्म पाहिला, तर अगदी वेगवेगळा दिसतो. पुराणात नित्य कर्म पाहिले, तर सगळा एक दिवस करावयास पुरणार नाही, इतके धर्म त्यात आहेत; पण त्यात काही नीती आहे, असेही नाही. कासोटा असा घालावा, गंध असे लावावे. शौचास अमुक कोस जावे, तोंड असे धुवावे, हेच फार आहे. याप्रमाणे नेम करणारास काय वाटले असेल, ते त्याचे त्यांसच ठाऊक. बरे, असे.
 याचा आजपर्यंत कोणीच विचार केला नाही. अलीकडे भट वगैरे झाले, यांनी काही ग्रंथ केले आहेत, पण ते त्याहून अधिक. गोपीनाथ भटजींनी अमुक भट्टी केली, गणेश भटांनी अमुक भट्टी केली. अशा शेकडो भट्टया केल्या आहेत, परंतु त्यात काय आहे ? संस्कृताचा अर्थ फार लोकांस कळत नाही, परंतु जर त्यांचा अर्थ कळावयाजोगा असता, तर मला वाटते की, लोक मागचे ते ग्रंथ समुद्रात नेऊन टाकते; परंतु ते भ्रमात आहेत. बरे, भरली मूठ सव्वा लक्षाची आहे. तेच बरे. श्राद्ध करावयाची कल्पना लिहावयास पन्नास पत्रे लागली आहेत. तसेच हर एक संस्काराच्या रीती फार मूर्खपणाच्या आहेत.
 लग्नाचा, उष्टावणाचा, देवपूजेचा पद्धती आणि कोणते कर्म असे नाही