पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२४ : शतपत्रे

तोंडावर होत नाही. व त्याचा त्याग करून सर्वांनी हलका मानणे व त्याचा लोकांत हरतऱ्हेने पाणउतारा करणे, हे धैर्य लोकांस नाही.
 जी गोष्ट घडते ती सहज घडते; परंतु प्रयत्नपूर्वक काही घडत नाही. वाईटास वाईट म्हणावे व शहाण्यास शहाणे म्हणावे, हे शहाणपण लोकांस नसल्यामुळे लोकही पाहिजे तशी वर्तणूक करतात. खोटे बोलणे व लबाडी करणे हे तर त्यांचे अंगी पडले आहे. त्याचा विधिनिषेध ते जाणतच नाहीत. लबाडी ही लज्जेची गोष्ट, ही लोकांमध्ये समजूत नाही; असे हे लोक मूर्ख आहेत. जर त्यांस काही गोष्ट सांगितली तर तिचा अर्थ कळत नाही व न्याय करता येत नाही. असे लोक अज्ञानात आहेत.

♦ ♦


भटांनी लावून दिलेले वेड

पत्र नंबर ६१ : २० मे १८४९

 हिंदू लोक हल्ली आहेत, त्यापेक्षा चांगले होण्यास त्यांनी बहुतेक आपली मूर्ख मते सोडली पाहिजेत. प्रथम ही मूर्ख मते उत्पन्न कशी झाली म्हणाल, तर त्याचे कारण लिहितो.
 प्राचीन काळी हिंदू लोकांनी विद्या बहुत केल्या. पुढे असे झाले की, ब्राह्मण लोकांनी नवीन विद्या अधिक अधिक शोधावयाचा सोडून ते काव्ये करू लागले आणि वेद पाठ करू लागले. अर्थ सोडून दिला आणि धर्मशास्त्रात असे आहे की, आपला कुलाचार रक्षावा. त्याप्रमाणे जे मागे बापाने केले तेच मुलाने करावे, अशी समजूत पडली आणि जो जो हे मूर्ख होत चालले तो तो मागले लोक त्यांस देवासारखे दिसू लागले.
 निरक्षर भट म्हणू लागले की, व्यास अवतारी होता व त्यांनी गणिताचे ग्रंथ केले. ते देव होते, असे म्हणून मागले ग्रंथ मात्र वाचावे. पुढे काही करू नये, असे झाले. तेव्हा अज्ञान फार वाढले व त्यांस साधन मुख्य पुराणे आणि माहात्म्ये लिहावयाची, हाच काही दिवसपर्यंत पंडितांचा रोजगार होता. तेव्हा त्यांनी मनास येईल ते लिहिले. कोणी कावेरी माहात्म्य, कोणी करवीरमाहात्म्य, कोणी शालिवाहनचरित्र, कोणी नाशिक माहात्म्य, कोणी अग्निपुराण, कोणी