पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : २२३

किंवा वर्तमानपत्रद्वारे त्यांस वर्तमान तरी माहीत असावे !
 एखादे गांवडे कुलकर्ण्यास पुसा की, कलेक्टरसाहेब यांची नेमणूक कोण करितो, त्यांस पगार काय आणि गवरनरसाहेब कोण आहेत व कोठून आले ? तर त्यांच्याने काही सांगवणार नाही. ज्या शहरामध्ये काही गोष्ट आहे तीच गोष्ट त्या शहरात ठाऊक नसते. पुण्यामध्ये शाळा आहे, लायब्ररी आहे व छापखाना आहे. हीच गोष्ट पाचशे रुपये महिना पगार किंवा पेनशन खाणारास पुसा म्हणजे ठाऊक नाही असे तो म्हणेल. कारण की, हिंदू लोक शोध करण्यात फार आळशी आहेत. कोणी कोणी शोध करणारे आहेत. परंतु लोकांच्या घरच्या गोष्टी व चहाड्या एवढे मात्र ते मनास आणतात. दुसऱ्या उपयोगी गोष्टी काही मनास आणीत नाहीत. व थोर आहेत ते जेवतात आणि निजतात. अशी त्यांची अवस्था आहे.
 मागे सांगतात की, दिल्लीचे बादशहाने, मिरची तिखट आहे किंवा कसे हे पुसले होते; व सूर्य हा पदार्थ काय आहे, हा प्रश्न पुसला होता. तद्वत् हल्लींही ऐकण्यात आहे की, कर्नाटकातील सरदारांपैकी एकाने पोलिटिकल एजंटास विचारले की, तुम्ही समुद्र पाहिला आहे किंवा नाही ? व आणखी एक वेळ असा प्रश्न केला की, 'कृष्णातीरी घाट आहे तो पाण्याने वहात का नाही ?' तेव्हा एक हुषार जवळ होता, त्याने सांगितले की, 'महाराज, पाण्याने घाट वाहून जातो, परंतु आमच्याजवळ हत्ती आहेत, त्याजकडून पुन्हा ओढून आणून जाग्यावर ठेवतो.' तेव्हा त्या मूर्खाची समजूत पडली. अशा किती एक अज्ञानपणाच्या गोष्टी ऐकण्यात आहेत. त्याचे वर्णन करून उपयोग काय? परंतु असे आहे तरी ज्यास खावयास मिळते त्यांस जरी फाशी द्यावयास काढले तरी वाचणे किंवा ज्ञान शिकणे, ही गोट त्याच्याने व्हावयाची नाही.
 या लोकांच्या इतक्या समजुती आकुंचित जहाल्या आहेत की, वर्तमानकाळचा विचार करतात, उद्याची काळजी करीत नाहीत. लाच खाल्ला म्हणून एकाची धिंड निघाली, काय चिंता आहे ? आपण मिळेल तोपर्यंत पैसा खाऊ; ज्या दिवशी काळ फिरेल त्या दिवशी पहातच आहोत. याप्रमाणे काळास दूषण देतात; पण आपण कर्मे कोणती करतो, याचा विचार करीत नाहीत. आणि इतके निर्लज्जपणास दुसरे कारण असे आहे की लोक शहाणे नाहीत. कुळंबी ते अडाणी कुळंबी; व ब्राह्मण ते शतपट मूर्ख आहेत. तेव्हा जो वाईट काम करतो, त्यांस असे वाटत नाही की, मला हे लोक वाईट म्हणतील. आणि वास्तविक पाहिले तर जे लोक वाईट कामे करतात, त्यांची निंदा पाठीमागे लोक पुष्कळ करतात; परंतु भित्रे आहेत, त्याजमुळे त्यांचे