पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२२ : शतपत्रे

पेशव्यांचे अमलांत इंग्रज मोठे आहेत व त्यांची काय अवस्था आहे, हे लोकांस कळले असते, तरा राज्य न घालवते; परंतु पोटार्थी भट, त्यांनी गोड खाण्याशिवाय दुसरे काही मनात आणलेच नाही. गोड खाण्यास मिळाले, म्हणजे सर्व ब्राह्मण एकत्र डोंगळ्याप्रमाणे जमतात व मग त्याचे अवधान फार लागते. कोठे मुक्तद्वार किंवा ब्राह्मण- संतर्पण किंवा उत्साह आहे, अशी वार्ता आली की, ब्राह्मण मोठ्या हौसेने तेथे जमतात. दुसरी काही राज्यकारभाराची किंवा ज्ञानवृद्धीसाठी सभा असेल, तर हालणार नाहीत ? तात्पर्य, या जातीची नजर जेवण आणि दक्षणा याहून पलीकडे जात नाही व याहून दुसरा मोठा कारभार पृथ्वीवर आहे, असे या जातीस वाटत नाही.
 एकास लाथ मारली तर दुसरा 'का' म्हणावयाचा नाही. इतके तर हे भित्रे, रांड्ये व निर्बल आहेत. यांचमध्ये साहस, धैर्य आणि खरेपणा ही प्रायशः नाहीत. साहस म्हणजे मोठे कार्य डोकीवर घेणे, धैर्य म्हणजे आपल्यावर किंवा दुसऱ्यावर जुलूम कोणी करील, तर न सोसणे आणि खरेपणा म्हणजे लबाडीचे व्यापारात न शिरणे. यांपैकी एकही गुण याजमध्ये नाही. जनावरासारखे हे मूर्ख आहेत, जशा शेतात पुष्कळ चिमण्या खावयास जमतात व त्यांस एक काठी उगारली, म्हणजे त्या भुरकन् उडून जातात, तसे हे ब्राह्मण लोक आहेत. यांची पंगत करावयास मात्र चांगली; परंतु दुसरा काही उपयोग नाही आणि सांप्रत पहा की, पेशव्यांचे राज्य गेले, हे वाईट जहाले, असे जे ब्राह्मण लोक म्हणतात, ते एवढ्याच कारणाने म्हणतात की, त्यांस खावयास मिळत नाही. ब्राहण लोक इतके दुर्बुद्धी आहेत की, त्यांस खावयास द्या व मग काही करा, चिंता नाही. पोटास घालावे आणि पायपोस मारावे, त्यांस लज्जा वाटणार नाही. आणि त्यांची म्हण अशी आहे की, पोटावर मारू नका, पाठीवर मारा, म्हणजे जेवावयास घाला मग काही करा. याप्रमाणे फक्त जेवणाची मात्र काळजी. पोटाचा विचार ब्राह्मण लोकांस पहिल्याने आहे; मग पाठीमागून सर्व. परंतु बहुधा तेवढा बंदोबस्त असला, म्हणजे ते उजवे किंवा डावे बाजूस पहावयाचे नाहीत, हे आम्ही लिहिलेच आहे.
 याविषयी कोणास खोटे वाटेल तर त्याने स्वदेशीय राजधानीतील लोकांकडे पहावे आणि त्यांस पुसावे की, 'इंग्रज हिंदुस्थानात कोठे कोठे राज्य करतात ?' ते म्हणतील की, 'छी ! इंग्रज कोठे आहेत ? आमचे संस्थानात तो एक ताम्रमुखी मात्र असतो.' याचप्रमाणे पेशवाईत अवस्था होती. पुण्यात वकील होता, तेवढी गोष्ट मात्र दरबारातील वागणारे यास माहीत. इतर लोकांस तेही माहीत नव्हते कोणी सुखी असेल तर त्यांनी प्रवास करावा असे नाही. परंतु ग्रंथद्वारे