पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३८ : शतपत्रे

मोठे शासन झाले पाहिजे. व यांची घरे व रात्रीच्या बैठका यांचा पत्ता लावून नीतीचे रक्षण करावे हे चांगले. नाही तर काय होईल ते ईश्वर जाणे. मनुष्याची कल्पना चालत नाही. आणखी याविषयी पुढे मजकूर लिहू.

♦ ♦


वाईट चालीचे प्रकार

पत्र नंबर १३

 आपले लोकांच्या मूर्खपणाच्या समजुती चालतात. त्यांपैकी ३० प्रसिद्ध झाल्या. त्यांची पुरवणी आणखी खाली लिहिली आहे, ती प्रसिद्ध व्हावी-
  (३१) स्त्रियांनी केला तो व्यभिचार; पुरुषाचा व्यभिचार करण्याचा पुरुषधर्म आहे, असे समजतात.
 (३२) सोदा तो शहाणा.
 (३३) सालसपणाने व खरेपणाने द्रव्य मिळत नाही.
 (३४) ज्याची सद्दी त्याचे राज्य; ज्यास काळ अनुकूल त्यांस सर्व भाळतात. मुलींचा व जनावरांचा पायगुण चांगला-वाईट असतो, असे समजतात.
 (३५) महार हिंदू आहेत व आपले देवाची पूजा करतात व धर्म मानतात; तरी म्लेंच्छांपेक्षा नीच कसे ?
 (३६) कार्यापुरती मैत्री व कारणापुरते आर्जव; तसाच रोगापुरता वैद्य.
 (३७) संसार सोडल्यावाचून ईश्वरप्राप्ती नाही.
 (३८) स्त्रियांचा पुनर्विवाह केला तर धर्म बुडेल व ब्राह्मणांची अब्रू जाईल.
 (३९) बैरागी वगैरे लोक घरेदारे, रोजगारधंदा सोडून फिरतात, त्यांस खाण्यास दिले तर पुण्य आहे.
 (४०) अब्रू गुणावर नाही, परंतु द्रव्यावर व मोठे कामावर आहे. बहुधा कोणाचे द्रव्य किंवा काम अपराधाखेरीज गेले, तर अब्रू गेली म्हणतात. हे कसे ?
 याचा विचार करून जे उत्तर देतील, त्यांचे आम्ही उपकार मानू. खरे असेल त्याचा स्वीकार व लबाड असेल त्याचा अनादर करावा, इतकीच आशा आहे.

♦ ♦