पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १३७

होऊन नग्न स्त्रियांची पूजा करीतात आणि तिचे ठायी देवीचे स्तापन करतात. किती एक व्यभिचार करीतात आणि एक महार किंवा मांग यांचे हातचे जेवतात. शिवरात्रीस व एकादशीस देखील अशी कर्मे करीतात आणि त्यांचे आणखी पुष्कळ विधी आहेत. कोणी आपले कपाळी कुंकू लावून तांत्रिक टिळकाची खूण बाळगतात. कोणाची खूण तोंडाची घाण असत्ये; मग ते आपल्या मंडळीत आपल्यास मोठे सामर्थ्यवान म्हणवितात. कोणी म्हणतात आम्ही ज्यास शाप देऊ त्यांस मारू; कोणी म्हणतात की आम्हास देवी दिसते; कोणी म्हणतात की, आम्ही जे चिंतू ते कार्य करू. अशी अनेक प्रकारची कर्मे ते आपल्या अंगी भासवितात, परंतु वागवीत नाहीत; तेणेकरून लोकांत निंदेस मात्र पात्र होतात.
 असे भ्रष्टाचार हल्ली ब्राह्मण लोकांत चालू लागले आहेत. त्यांनी वैदिक मार्ग, अग्निहोत्र, ज्ञानप्राप्ती, वेदपारायण, पुराण-मार्ग, शालिग्राम-पूजा इत्यादिक धरून स्वस्थपणाने भगवंताचे भजन करावयाचे, ते सोडून या नरकवासरूप पंथात पडून राहिले आहेत. मला तर वाटते की, याचे साधन नरक मात्र आहे. असे जे दुष्ट लोक नीतिभ्रष्ट करतात, त्यांस ईश्वर शासन केल्याशिवाय राहणार नाही. पेशव्यांचे राज्यात ब्राह्मण धर्माचा काहीसा बंद होता, कारण की ते नियंते होते; परंतु हल्ली तर ब्राह्मण अतिशूद्रापेक्षाही वाईट कर्मे करतात. त्यांस कोणी शासन करणार नाहीसा झाला आहे. जे चार गरीब आहेत ते भितात की कोणी अब्रूची अर्जी कोडतात करील. मग हुकूमनामा होईल. हे कष्ट कोणी भोगावे ? परंतु, मला वाटते की, अद्यापि वाममार्गी ब्राह्मण फार नाहीत. दक्षिणमार्गी जर सगळे जमले, तर त्यांस ताळ्यावर आणावयास उशीर नाही. किती एक लोकांनी जेवावयास जाणे सोडले व किती एक घरात बसतात, कोणाच्या घरी जात नाहीत, असे त्रासले आहेत. परंतु कोणामध्ये असा धीर होत नाही की, सर्वांस बोलावून याचा निर्बंध करून बंदोबस्त करावा आणि मूळचे पवित्र स्थितीवर ब्राह्मण धर्म आणावा, म्हणजे शुद्ध ज्ञान-मार्ग, शास्त्रविचार, परमेश्वराचे आराधन करणे इत्यादीक मार्ग स्थापावे आणि मंत्रतंत्र व जारणमारण इत्यादिक गोष्टी किमयासारख्या अशक्य, परंतु अडाणी लोकांस भुलविण्याकरिता ब्राह्मण लोक प्रतिष्ठा दाखवून दुष्ट कर्मे करीतात. ही एकदम बंद होतील तर चांगले आहे.
 पूर्वी इराण देशात असा एक मजदाद (मेहदी ?) नामक खोटा पैगंबर होऊन व्यभिचार नाही, असे मत चालू करीत होता. परंतु नशरिवात राजाने त्यांस फाशी दिले, तेव्हा ते मत आटपले. तसे या दुष्ट वाममार्गी लोकांस