पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १३९


वैराग्य

पत्र नंबर २६ : १३ ऑगस्ट १८४८

 मनुष्यमात्राने आपले परलोकांचा विचार करावा, एक हे सर्व गोष्टींहून उत्तम आहे; असे असता किती एक सांसारिक जन लौकिक विचार मात्र करतात. एक क्षणभरदेखील ईश्वराचे स्मरण करीत नाहीत. याहून मोठे आश्चर्य काय आहे ? मनुष्यास ईश्वराने बुद्धी दिली आहे, तिचा उपयोग इतकाच की, इतर सर्व जनावरांपेक्षा हे जनावर श्रेष्ठत्व पावून आपले कर्त्याचे उपकार जाणून त्याची कीर्ती आणि दया वर्णन करील; परंतु हा सन्मार्ग सोडून किती एक गैर रस्त्याने जात आहेत. आणि क्षणभंगुर देहाचे पोषणाकडे सर्व लक्ष देऊन आपले जे महत्कल्याण, ते करून घेत नाहीत.
 पहा, कित्येक मेहनतीचे कामात पडले आहेत. किती एक चाबूकस्वार, किती एक कारकून, कित्येक मजूर, किती एक शास्त्री व कित्येक वैदिक आहेत. कित्येक सूर्यादयादारभ्य नाचतात व संत म्हणवितात; परंतु हे सर्व देवास जाणत नाहीत. केवळ पोटाकरिता उद्योग संपादून असतात. याचा दाखला असा आहे की, गोसावीबोवास जर बिदागी कमी पोचली, तर त्यांस राग येतो. पुराणिकास तांदूळ मिळाले नाहीत, तर त्यांस संताप येतो. भटास दक्षणा मिळाली नाही, तर तो रागावतो. असेच बहुतेक लोक आहेत. तेव्हा कोणी धर्मसंबंधी किंवा प्रपंचासंबंधी द्रव्याचे आशेवाचून काम करीत नाहीत, हे स्पष्ट आहे. यास्तव यापैकी कोणी साधूचे अभिधान पावण्यास योग्य नाहीत.
 मला असे वाटते की, संसार आणि परमार्थ ही दोन कामे पृथक आहेत. त्याची मिसळ करू नये. परंतु किती एक लोक फक्त संसाराकरिता काही कामे करतात आणि ती देवाकरिता केली असे म्हणतात. मला एक साधू असा ठाऊक आहे की, त्याची पूजा व भजन किंचित होते; तत्रापि त्याजकडे लोक फार येऊ लागले, तेव्हा त्याची पूजा वाढली. म्हणजे, दांभिकपणाने तो चार घटिका अधिक बसू लागला व तेच लोक कमी होताच पुन्हा मूळचे प्रमाणे झाला. हा केवढा नीचपणा आहे !
 देवाने सर्वदा माझे भजन करा, म्हणून मनुष्यावर ओझे घातले नाही. तो इतकेच भजन मागतो की, जे आपले आणि आपले कुटुंबाचे व इतर जनांचे काम आहे, ते सर्व चांगले रीतीने करून नंतर जी वेळ सापडेल, ती