पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३६ : शतपत्रे

असता लक्ष्मी प्राप्त व्हावी, पुत्रकामना इत्यादिक वासना तृप्त व्हाव्या, म्हणून उपासना करतात, असे शाक्त सांगतात; परंतु मला वाटते की, ते काही नाही; त्यांची मद्य मांस खाण्याची व्यसनेच प्रमुख आहेत. ती पुरती होण्याकरिता निमित्त करून किती एक निर्लज्जपणाने आपले घरी दारूचे कारखाने करून मद्य तयार करतात. व किती एक विकत घेतात व ते जरी गुप्तपणाने असे करतात तरी त्याचे श्रीमुखाची दुर्गंधी जेथे बसतील तेथे प्रगट होऊन हे शाक्त आहेत, असे सर्वांस समजते व किती एक मस्त होऊन घरी व रस्त्यात सापडतात. या गोष्टी प्रसिद्ध आहेत, परंतु त्यांच्या प्रतिबंधाचा उपाय कोणी लोक समजून करीत नाहीत. किंबहुना त्याजवर झाकण घालून जो तो म्हणतो की, हे अपेश डोकीवर कोणी घ्यावे ! हे कलियुग आहे. मी तुम्हास थोडासा या प्रकरणाचा इतिहास कळवितो. तो मी श्रमेकरून समजून घेतला आहे. यास्तव हा दुष्ट पंथ सुटण्याकरिता प्रगट व्हावा.
 या पंथांतील लोक आहेत त्यांस वाममार्गी किंवा वामाचारी असे म्हणतात आणि शाक्त हेही नाव त्याचे प्रसिद्ध आहे. प्रथमतः ज्यांस मद्यमांस खावे अशी बुद्धी होते, तो जो दुसरे वाममार्गी आहेत याचे भजनास लागतो. नंतर ते एक दिवस बहुधा अमावास्या किंवा अंधारी रात्र अशी योजतात आणि त्या दिवशी त्या उमेदवारास आपले धर्मात घेण्याचा संस्कार करीतात, तो असा की, त्या दिवशी मध्यरात्रीस आठ असामी वाममार्गी आणि आठ स्त्रिया एक एक वेगळा जातीची असावी, म्हणजे विधवा, ब्राह्मणी, परटीण, न्हावीण, कळावंतीण, गौळीण, कोष्टीण, सोनारीण, सुवाशीण एकूण आठ, त्या गुरूच्या घरी मिळोन येतात; आणि तेथे स्थंडिल घालून आठ कलश मद्याचे व मांस असे मांडतात. अग्नि पेटवितात आणि त्याजवळ काली म्हणजे देवीची मूर्ति मांडितात. नंतर प्रत्येक पुरुष स्त्रीचे शेजारी बसतो आणि पूजा करीतात. नंतर प्रतिज्ञा करवीतात की, 'मी आजपासून जातिनिषेध मानणार नाही व मद्य-मांस भक्षीन व स्त्री स्वकीय किंवा परकीय यांचे ठायी निषेध किंवा व्यभिचार मानणार नाही, मला सर्व सारखे आहे. येणेकरून मला भगवती मेल्यावर मोक्षास नेवो. आणि या जन्मी सुखसंपदा देवो.' अशी प्रार्थना व प्रतिज्ञा करतात.
 नंतर पूजा संपूर्ण झाली म्हणजे तंत्र शास्त्रांतील काही उपदेश करीतात. आणि नित्य पूजेचा मार्ग सांगतात. यानंतर तो वामाचारी दीक्षित झाला. मग त्याने पुनरपि अंधेरी रात्रीस पूजेचा बेत केला म्हणजे तशा स्त्रिया जमवून ते सोबती जमवून बसावे; आणि स्त्रियांस ते भैरवी म्हणतात व आपल्यास भैरव म्हणतात व दारूस सिद्ध म्हणतात; अशी विलक्षण नावे घेऊन कोणी नग्न