पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १३५

आमचे लोकांचे माहात्म्य इकडे काही नाही, तरी विलायतेस मोठे आहे असे दिसते. व ही मसलतीची व राजकारणी गोष्ट आहे. इंग्रजांस असे वाटते की, जर आपण लोकांचे चालीविरुद्ध काही केले, तर हिंदुस्थानचे राज्य आपले बुडेल व लोक आपल्यास हाकून देतील? यास्तव ते जपून चालतात. अशी त्यांची मसलत आहे.
 परंतु ते कसेही असो, दुसऱ्यांनी करू नको म्हटल्यावर मग करू नये, हे शहाणपण नव्हे. चांगली गोष्ट असेल ती स्वयमेव अंगीकारावी. होळी अगदी बंद झाली तर फार चांगले आहे. व या दुराचारास शास्त्राची आज्ञा आहे, असे आम्हास वाटत नाही. येविषयी आमचे मत खरे आहे किंवा नाही, हे कोणी विद्वान मनुष्य आम्हास लिहून उत्तरी कळवितील तर आम्ही फार खुशी आहो. परंतु ते कसेही असो. होळीचा मूर्खपणा इतका उघड आहे की, त्याविषयी लिहिणे हे वृथा श्रम आहेत. परंतु लोकांस मूर्खपणा फार, याजमुळे त्यांचे ध्यानात येत नाही. व दुसरे असे आहे की, मूर्ख लोक यांचे हाती द्रव्य व अधिकार फार आहेत. याजमुळे त्यांचे उत्तेजन दुष्कर्मास फार आहे. म्हणून ते सुधारणा करण्यास तुच्छ मानतात. परंतु आम्हास धीर पुष्कळ आहे.

♦ ♦


शाक्त मार्ग

पत्र नंबर ६ : २३ एप्रिल १८४८

 हिंदू धर्मात बहुत ग्रंथ आहेत. मला वाटते की, सरासरी शंभर एक असावे. असेच दुसरे धर्मातही आहेत. परंतु या पंथांपैकी एक दुर्घट पंथ तंत्राचा आहे. म्हणजे रुद्र, यामल व योनीतील तंत्र वगैरे ग्रंथ आहेत. त्यात शक्ती-उपासना करण्याचा मार्ग लिहिला आहे. तो बंगाल देशात व गौड व उडीसा (ओरिसा) प्रांतात पूर्वीपासून चालतो. तेथील लोक शक्ती-उपासना तंत्राधाराने करतात. म्हणून या देशात ते लोक मंत्री व सामर्थ्यवान आहेत. अशा गप्पा फार आहेत.
 त्याचे खरेपण किंवा खोटेपणा काय असेल ते असो. त्याचा विचार मी सांप्रत करीत नाही. परंतु मला बहुत खेद होतो की, तो पंथ अलीकडे दक्षिणेत पुणे इत्यादी ठिकाणी बहुत चालू लागला आहे. त्याचे कारण पाहिले