पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३४ : शतपत्रे

वाटत नाही ? बापाचे श्राद्ध किंवा कपिलाषष्ठीचा पुण्यकाल आला तर आनंदाने गरिबास त्यांच्याने दोन पैसे धर्म करवत नाही. आणि शिमग्यात दुष्ट स्त्रियांचे पोषणाकरिता उल्हासाने हे द्रव्य देतात. तेव्हा साजिंदे व भडवे हे पूर्वजन्मीचे ऋणी असतील असे वाटते. जितके देऊळ पवित्र तितकेच हे व्यभिचारगृह अपवित्र असे असून त्यात पापाचा साठा करीतात, हे नरकाचे साधन करीतात, की नाही बरे ?
 आमचे हे पुणे शहर आहे, तत्रापि आपल्या लग्नाच्या स्त्रिया व सख्ख्या आया यांस पोटास घालावयाची किती एकास भ्रांती असली, तरी त्यांनी कर्ज काढून कसबिणीच्या हातात दोन रुपये दिले नाहीत तर त्यांस असे वाटते की, आमची मंडळी (ज्याचे सोबतीत फिरतो ती) आम्हास हसेल. ही लज्जा बाळगून हरेक प्रकारे करून चार रुपये ते मिळवितात आणि त्यांचा पातकात व्यय करतात. जे भले मनुष्य असतात, त्यासही ते पिशाच्चरूप स्नेही नरकात ओढतात. आणि आपल्यास शाबास मानून असे समजतात की, यंदाचा शिमगा चांगला केला. आम्ही धन्य आहो. चोरांचे मंडळींत जो चोरी शिताफीने करितो, त्यांस इतर चोर वाहवा म्हणतात, तशीच ही अवस्था आहे.
 याप्रमाणे पुणे शहरात आमचे पाहण्यात पुष्कळ आहे. पुणे द्रव्याने हलके आहे खरे, परंतु दुष्कर्मात तेथील लोक द्रव्यवान शहरापेक्षा अधिक आहेत. व बहुत लोक आपले सामर्थ्याची पराकाष्ठा करून रांडांचे ताफे बाळगण्याचा खर्च जीवादारभ्य करीतात. त्यात लहान मुले पाहून त्यांची मला फार करुणा येते. कारण की, हे भ्रष्ट झालेले लोक आपले उदाहरण त्यांस देऊन त्यासही आपले शाळेत विद्वान करतात. नंतर ते वाढल्यावर कसे होतील, याचे लक्षण सहज ध्यानात येईल. मला वाटते की, पाच दिवस हे लोक नर्कवास करतात. कारण की, त्यांचे कानी, मुखी, मनी व चित्ती पातकाशिवाय दुसरे काहीही नसते. 'कुरीयर' नामक इंग्रजी पत्रात असे लिहिले आहे की, सरकारने हा सण बंद करण्याचा बेत करावा. तो असा की, दरबारात या सणाबद्दल सुट्या आहेत, त्या बंद कराव्या व पुण्यास रात्रीच्या तोफा बंद करता त्या करू नयेत. व माजिस्त्रेट साहेब यांणी कोणी दांडगाई किंवा वाईट भाषण अगर दंगा करील त्यांस मोठे शासन करावे.
 हे सर्व बेत सरकारने केले तर चांगले आहेत. लोकांस वाईट मार्गातून काढल्यासारखे होईल. परंतु सरकार प्रस्तुत असे करीलसे दिसत नाही. कारण सरकार स्वतंत्र नाही. त्यांस विलायतेहून अधिकाऱ्यांची पत्रे वारंवार येतात की, हिंदू लोकांचे रिवाजास व चालीस व धर्मास अगदी अटकाव करू नये.