पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १३३


शिमग्याचा दुराचार

पत्र नंबर ४ : ९ एप्रिल १८४८

 लोकांत वाईट गोष्टीचा परिचार त्वरित पडतो, व चांगले गोष्टींचे ग्रहण होण्यास बहुत उशीर लागतो, हा एक साधारण नियम आहे. व दुसरा एक नियम असा आहे की, जी एखादी चाल काही कारणावरून एक वेळ पडते, तीच पुढे काही काळाने अंधपरंपरा चालू लागते. तसेच हे होळीचे माहात्म्य आम्हास दिसते. हल्ली हे पाच दिवस होळीचे आहेत, हे प्रत्येक ठिकाणी लोक अधर्माने क्रमीत आहेत. व त्यात मूर्ख आणि उनाड लोकच आहेत असे नाही. बहुत संभावित, शहाणे व थोर लोक अंशतः त्यात मिसळून आपला अपमान करिताहेत. तेव्हा त्यांस संभावित हे नाव शोभते काय ? नाही; सगळे सारखेच योग्यतेचे असे म्हटले पाहिजे.
 परंतु हा दोष त्याजकडेस आहे असेच केवळ नाही. हा संगतिदोष लहानपणापासून आसमंतात भागी ही दुष्कृत्ये पाहिल्याने प्राप्त होतो. आणि एकदा निर्लज्जपणाच्या भावना मनात ठसल्या म्हणजे त्या जात नाहीत. उलट्या इतक्या सुदृढ होतात की, आम्ही आता लिहितो आहो, हे किती थोड्यांस आवडेल आणि किती बहुतांस आवडणार नाही, हे आमच्याने सांगवत नाही; परंतु जर त्यांनी विचार केला तर त्यांस आम्ही म्हणतो, हे खरे वाटेल यात संशय नाही. वाचणाराने असे म्हणू नये की, माझा बाप, माझा आजा, माझे शेजारी, हे सर्व असे कर्म प्राचीन काळापासून करीत आले व मीही लहानपणापासून त्यातच वाढलो; तेव्हा त्याचे विरुद्ध जे हे भाषण ते उपयोगी काय ? तर आमची त्यांस अशी प्रार्थना आहे की, तुम्हास ईश्वराने विचारशक्ती दिली आहे. तेणेकरून सारासार पहा. यद्यपि शास्त्राचा आधार थोडासा असेल तरी शास्त्रात आणखी बहुत सत्कर्मे लिहिली आहेत ती सर्व तुम्ही करता काय ? आणि जर करीत नाही, तर मग भ्रष्टपणास मात्र शास्त्राचा आधार तुम्ही कशाकशाकरिता धरता ? सार कोणते व असार कोणते, हे पहाणे तुम्हाकडे आहे.
 ईश्वराने तुम्हास जिव्हा दिली आहे. तिचे योगाने कुत्सित, बीभत्स व निंदायुक्त भाषणे करिता आणि लज्जास्पद मूर्खपणाचे स्वर काढिता हा थोरपणा काय ? आम्ही तर याला मनुष्यपणाही म्हणणार नाही. मग थोरपणा म्हणू कोठून ? रानात जनावरे फिरतात व त्यासारखे हे लोक फिरतात. त्यांस लज्जा कशी