पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १२१

कोणी वाचणारा नाही. जे आहेत ते गरीब आहेत. श्रीमंत व थोर जुन्या काळचे. यांस असे वाटते की, हा कागद व्यर्थ खर्च कशाकरिता करतात ? व यात उपयोग काय ?
 परंतु त्यांचे लक्षात असे येत नाही की, आम्ही केवळ मूर्ख आहो व आम्हांस काही समजत नाही. पहा की, या लोकांस आमचा देश कोठे आहे व आणखी देश कोठे आहेत, व तेथे कोण आहेत, व या देशात सुधारणा काय पाहिजेत, व जर कोणी करू लागला, तर त्यांस अनुकूल व्हावे, हे समजत नाही. नाना प्रकारच्या विद्या आहेत, त्यापासून लाभ बहुत आहेत. समुद्रात नावा चालविण्याची विद्या आमच्या लोकांत कोठे आहे ? रसायन शास्त्र व त्यापासून लाभ होतात, हे कोठे माहीत आहे ? यंत्रज्ञान कोठे समजते ? निदान चांगले कोणते व वाईट कोणते, याचा देखील भेद समजत नाही. जर कोणी चांगल्या कामास आरंभ केला, तर त्यांस वाईट म्हणतात. कोणी वाईटास केला, तर त्यांस चांगले म्हणतात. असे विलक्षण लोक आहेत.
 कोणी उपयोगी ग्रंथ केला, तर तो कोणी घेत नाहीत, व त्यात काय आहे, हे देखील पहात नाहीत. त्यांस असे कळत नाही की, ज्या मनुष्याने ग्रंथ लिहिला, त्याचा काही तरी हेतू असेल, व त्यांस असे वाटत असेल की, लोकांस ज्ञान नाही, तेव्हा ते या ग्रंथाच्या द्वारे त्यांस मिळावे; परंतु लोक ही गोष्ट समजत नाहीत. ग्रंथात काही असो, कोणी काही म्हणो, ते जुन्या रीतीने सर्व गोष्टी घडाव्या असे पाहतात. त्यांस अद्यापि इतके देखील समजत नाही की, आमचे लोकांस काही कळत नाही. त्यांस बहुत ग्रंथ झाले असता उपयोग होईल, व देशातील लोक शहाणे होतील.
 त्यांची समजूत अशी आहे की, संक्रांत आली तर चार आणे खर्चून, एक तांब्याची तबकडी घेऊन, आत तीळ घालून दक्षणेसहित एखाद्या मूर्ख ब्राह्मणाच्या हाती देतील. आणि आम्ही धर्म केला, धन्य झालो, असे म्हणतील; परंतु हेच चार आणे देऊन अमुक एक नवीन ग्रंथ झाला आहे, तो घेणार नाहीत. बरे, तिळपात्र दिले, त्यात दोन आणे ब्राह्मणाच्या पदरी पडतात व दोन आणे तांबटास मिळतात, तद्वत् चार आण्याचे एक पुस्तक घेतले तर दोन आणे कागदाबद्दल जातील व दोन आणे मजुरीबद्दल ब्राह्मणास मिळतील, तेव्हा हाही त्याचे रीतीप्रमाणे धर्मच झाला.
 वामन द्वादशीचे व्रत करतात; त्यांस बारा लहान पोरे मुंज जहालेली आणून त्यांस दोन तीन रुपयांचा विषय देतात; परंतु तो विषय असा असतो की, त्याचा उपयोग काही पडत नाही. परंतु लोकांस असे वाटते की, हे पुराणात