पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२२ : शतपत्रे

सांगितले आहे, त्याप्रमाणे आहे. म्हणून हेच पुण्य; परंतु त्या रुपयांची पुस्तके आणून मुलांस दिली किंवा त्या रुपयांत ब्राह्मणाचे मुलास एखादी विद्या शिकविली, शाळेत आठचार आणे देऊन त्यांस पाठविले, तर त्यांस फायदा होईल. सोन्याच्या प्रतिमा करून ऊस, मडके यात पूजा करून द्याव्या, त्यापेक्षा ग्रंथ दिले तर मुले जन्मपर्यंत वाचतील; शहाणी होतील, आणि उपयोग फार पडेल.
 तसेच लोक मरतेसमयी तुला करतात. त्यात पाच चार हजार रुपये भरतात व मग ते मनास येईल तसे उडवितात; त्यांस काही अनुक्रम नसतो. त्या पाच हजार रुपयांचे काही तरी चिरकाल राहण्याजोगे काम केले, तर किती लोक शहाणे होतील ? लोक असे म्हणतात की, पुष्कळ ग्रंथ लिहितात परंतु पैसा कोणापाशी आहे ? विकत घ्यावे कोणी ? आणि इकडे तर असा अनिर्वाच्य खर्च करतात. आणि जे उपयोगी ते करीत नाहीत.
 आता वृद्ध लोक जे आहेत, ते तर सुधरतील, हे घडतच नाही. कारण की, जो मनुष्य पंचवीस वर्षांवर जहाला, त्याची समजूत लहानपणी जी पडते, तीच त्याची कायम होते व त्यांस असे वाटते की, मी शहाणा, मला शिकवितात काय? याच शहाणपणावर मी पैसा मिळविला, संसार केला. आता जरी दरिद्र आले, तरी मी वेडा आहे, हे त्याला कदापि वाटत नाही, यास्तव त्याची सुधारणा व्हावयाची नाही. म्हणून या देशात जितके पंचवीस वर्षांवरचे जुने काळच्या समजुतीचे माणूस आहेत, त्यांची आशा अगदी नको. ते जातील तेव्हा पक्की सुधारणा होईल.
 परंतु जे लहान आहेत व ज्यांस शहाणपण मिळवावयाचे आहे, त्यांजवर आमची आशा आहे. आणि त्यांचे हातून काही सुधारणा झाली, तर होईल; याजकरिता विद्याभ्यास जो करविणे, तो चांगली समजूत पडेल, लोक विचार करणारे होतील, अशा प्रकारचे त्यांस पंतोजी व शाळा पाहिजेत. व जी भाषा व जे ग्रंथ प्रथम मुलांचे हाती पडतात व ज्या मनुष्याची संगत त्यांस असते, तशी त्याची समजूत होते. जर संस्कृत भाषा प्रथम मुलास समजाविली, तर त्याच्या समजुती तशाच होतील. जर इंग्रजी शिकविले तर तशा होतील. जर मराठी शिकविले तर तशाच होतील. यास्तव मुलास ग्रंथ वाचावयास द्यावयाचे ते प्रथम चांगले पाहिजेत. त्यांस सुबुद्धी होऊन त्यांची समजूत चांगली पडावी व त्याणी बहुत वाचण्यावर लक्ष द्यावे व त्यांच्या मनातून जुन्या काळच्या भटांकडून ज्या समजुती येतात त्या सर्व खोट्या, असे त्यांस भासले पाहिजे व त्यांस ग्रंथांची गोडी लागून ग्रंथ वाचावे असे वाटले पाहिजेत.
 आमचे लोक सांप्रत काळी अगदी अज्ञानी आहेत. त्यांस ग्रंथ म्हणजे