पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२० : शतपत्रे

आहे. तुम्ही लबाडीवरच पोट भरता, तस्मात् आम्ही तुमचा त्याग करितो. अशी अवस्था होईल, यात संशय नाही.
 हा मूर्खपणा बहुत काळपर्यंत निभला, कारण की गौप्य होते. आजपर्यंत महान प्रयत्नाने झाकून झाकून चालविले; परंतु आता चालणार नाही. अडाणी लोकांकडे एखादी पंचाईत न्या, तर ते लागलाच न्याय सांगतील. बरे तीच पंचाईत चार पंडिताकडे न्या, म्हणजे अतोनात वाद करतील आणि नाना प्रकारच्या मसलती काढून असत्य प्रतिपादन करतील, अशी त्यांची अवस्था आहे. त्यांची मने बिघडून जातात आणि भ्रांती उत्पन्न होऊन त्यांस विवेचन करता येत नाही. खोट्यांस स्थापन करण्याकरिता प्रमाणे दाखवितील आणि त्याचा पक्ष धरून भांडत बसतील. याचा अनुभव, कोणीही विचार करून, त्याची वर्तणूक पाहिली तर लक्षात येईल.
 जेथे बहुत पंडित, तेथे मूर्खपणा वाढून भ्रष्टाकार होतो. अधर्मप्रवृत्ती होते व इतर लोकांवर दया करणे, हे त्याजपासून घडत नाही. त्यांची समजूत अशी आहे की सर्वांनी दुःख भोगिले, तर चिंता नाही; परंतु आम्ही मात्र सुखी असावे. तदनुसार उदाहरण पहा. शास्त्री यांचे मताने ज्या ज्या गृहस्थांनी अन्नछत्रे घातली तेथे शूद्र गेला तर त्यांस अन्न मिळत नाही आणि ब्राह्मण श्रीमंत झाला, तरी त्यांस जेवावयांस बोलावितात ! असाच चमत्कार आहे.
 अस्तु. सर्व लोकांस ज्ञानप्राप्ती होईल, तेव्हा हे सर्व पंडितांचे गुण बाहेर पडतील.

♦ ♦


नवीन ग्रंथांची आवश्यकता

पत्र नंबर ९३

 आमचे लोकांस विचार अगदी नाही. विद्या वाढवणे व बुद्धी वाढवणे हे तर त्यांस माहीत नाही. सांप्रत सुधारलेले लोक विद्यावृद्धी करण्याकरिता पुष्कळ झटत आहेत; परंतु हे इतर कोणाचे मनात देखील येत नाही. मराठी भाषेत ग्रंथ अनेक छापिले आहेत व आणखीही वरचेवर छापत आहेत. वर्तमानपत्रात अनेक तऱ्हेचे मजकूर व माहितगारी लिहून छापतात; परंतु त्यांचा