पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ११९

धरतात, ते महामूर्ख समजावे. या लोकांपासून या देशाचे किमपि हित होणार नाही; अधिक मूर्खपणा मात्र वाढेल व भ्रांती वृद्धिंगत होईल. आणि ती ज्यांचे मनात शिरेल, त्यांचा प्राण गेल्यावाचून निघणार नाही. यास्तव हे शास्त्री, पंडित अगदी निरुपयोगी आहेत, हा सिद्धान्त होतो.
 ही विद्या काही उपयोगी नाही. जर असे नसेल, तर मला कोणी उत्तर द्यावे की, व्याकरणाचे पंधरा वर्षे अध्ययन केले, त्यापासून अमुक उपयोग होतो. असे मला दाखवून द्यावे, म्हणजे मी वास्तविक म्हणेन; परंतु मी शोध केला आहे, त्याजवरून मला तर वाटते की, मनुष्यास लाकडे तोडावयाचे कसब शिकविले तर बरे; परंतु हे व्याकरण नको. यात काहीच अर्थ नाही. केवळ मूर्ख होण्याची विद्या आहे. आणि इतकेही असून ज्याचा त्यांस असा गर्व असतो की, मी केवढा विद्वान, माझ्यासारखा विद्वान त्रैलोक्यात नाही पाहिला तर तो सर्वांहून मूर्ख असतो.
 याप्रमाणेच ज्ञान, मीमांसा, अलंकार या शास्त्रांची व्यवस्था आहे. केवळ असत्य सिद्धान्ताचे प्रतिपादन करून, विलक्षण कुतर्क करून भलतेच अविचार लोकांत स्थापन करतात. आणि वास्तविक पाहिले तर ब्राह्मणांमध्ये चार रोजगार आहेत. सराफ, भट, पंडित व हरदास. या सर्वांपेक्षा पंडित हे महामूर्ख होत. सराफ, भट, हरदास हे बरे. हे यत्किंचित पढलेले असतात. याजमुळे हे दुराग्रहीं नसतात व यांस अभिमान नसतो. सांगितलेली गोष्ट ऐकतात व ह्यांचे लक्ष व्यावहारिक मार्गावर फार असते. याजकरिता काही सुधारण्याचा रस्ता यात आहे. परंतु हे विधिज आहेत, म्हणून पंडित यांची समजूत फार दृढ होती की आमचे मत खरे आहे व इतर सर्व मूर्ख आहेत. याजकरिता यांचा दुराग्रह फार होतो, तो हे सोडीत नाहीत, अतिशय आग्रह धरितात. याजमुळे हे लोक अगदीच उपयोगी नाहीत.
 हिंदू लोक यांचे महान दुर्भाग्य म्हणून हे पंडित व शास्त्री या लोकांचे पुढारी झाले व यांस लोक समजतात की, हे धर्मरक्षक आहेत; परंतु हे अधर्मवृद्धी करणारे होत. व हे सोनार, परभू, ब्राह्मण वगैरे यांचा यत्किंचित निमित्ताने वाद लावून दोहोंकडून पैसा खाणार व खोटी मते आणि नाना प्रकारची खोटी कर्मे प्रसिद्ध करून भोळ्या लोकांस ठकविणार; यास्तव त्यांस आवडतही नाही की, आपली शास्त्रे बहुत लोकांस ठाऊक व्हावी; कारण तेणे करून आपली उघडीक होते व दगाबाजी व लबाड्या बाहेर पडतात. हे त्यांस फार भय आहे. जोपर्यंत आच्छादित आहे, तोपर्यंत यांच्या प्रतिष्ठेचे आयुष्य आहे, मग किरकोळ लोक यांस पुसतील की तुम्ही आम्हास सांगता; परंतु ही सर्व लबाडी