पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११८: शतपत्रे

झाले, पैशाकरिता महापातकी असला तरी त्यांस शुद्ध म्हणतील, महा नीच असला, तरी त्यांस सन्मान देतील. पापाने द्रव्य मिळविले तरी, त्यांस दिले म्हणजे तो सद्व्यय झाला अशी समजूत करून आणखी तसेच मिळीव, म्हणून सांगतील.
 याचे उदाहरणास फार लांब जावयास नको. बाजीराव पेशव्याने पुण्यात ब्राह्मणांचे मनोरथाप्रमाणे दाने केली व बहुत शास्त्री, पंडित जवळ बाळगिले; परंतु त्याणीं त्यांस सत्कर्मास किंवा आपले राज्य रक्षिण्यास किंवा नीतीने चालविण्यास समजूत दिली नाही. ते त्याणें केले, त्याजविषयी त्याची स्तुतीच करीत गेले व महाराज सर्वत्र विजयी होतील, असे आशीर्वाद देत गेले. आपण ब्राह्मण परभू आपले तेज सर्वांहून अधिक; आपलेकडून एक शिपाई गेला तर सर्वांचा पराजय होईल, याप्रमाणे बोलून, त्याजकडून राज्यकारभार सोडून देववून त्यांस पंडितांचे आर्जव करणारा असा मूर्ख केला व शेवटी आपण आणि तो असे दोघेही भीक मागत गेले. यास्तव हे पंडित जरी पुष्कळ पढलेले असले तरी ते मूर्ख समजावे; कारण ही लोकहितकारक ज्ञान त्यांस नाही. त्यांचे ज्ञान भाटांचे व तमासगिरांचे बोलण्याप्रमाणे आहे. त्यापासून मोक्ष व्हावयाचा नाही व इहलोकी सुखोत्पत्तीही व्हावयाची नाही.
 सारांश, हल्लीचे पंडित हे महामूर्ख असे मी म्हणतो. हे नाना प्रकारचे अर्थ फिरवितात. नानाप्रकारचे असत्य सिद्धान्त करतात आणि क्षणांत मुक्तीचा मार्ग, क्षणात नरकात जाण्याचा मार्ग दाखवितात. यांस मुख्य ज्या गोष्टी त्याचे ज्ञान नसते. मनुष्य जन्मला कशाकरिता ? त्याचे सार्थक काय ? व आपले कर्तव्य काय ? याचा विचार त्याचे मनात क्षणभरही वसत नाही. द्रव्याचा व मानाचा लोभ धरून हे असतात. यांचा आश्रय जो कोणी करील, त्यांस वेड लागेल यात संशय नाही व त्यांची बुद्धी स्थिर नाही.
 अमुक सत्य, अमुक असत्य, हेही त्यांस भासत नाही. सत्याचा व असत्याचा भाव यांस समजत नाही. धर्माचा, अधर्माचा भेद त्यांस ठाऊक नाही. जो पाहिजे तो शास्त्रार्थ काढून देतील; जे पाहिजे ते प्रायश्चित्त देतील. फक्त पैसा मिळाला म्हणजे झाले. अशा पंडितांचा संग्रह करून कोणास काय फायदा होणार आहे ? राजास होणार नाही व प्रजेसही होणार नाही. व ज्या प्रजेचे पुढारी असले लोक विनाकारण आपल्यास विद्वान म्हणवितात, त्या प्रजेचा सर्वस्वी नाशच होईल याप्रमाणे हिंदू लोकांची व्यवस्था झाली आहे. या लोकांस शास्त्रीपंडितांखेरीज दुसरे कोणी पुढारी मिळतील, तेव्हा या लोकांमध्ये व्यवस्था चांगली होईल व शास्त्री, पंडित पुष्कळ असावे, अशी जे इच्छा