पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ११७


सांप्रतचे पंडितांचे ज्ञान

पत्र नंबर ८६

 सांप्रत काळचे पंडितांचे ज्ञान असे असते की, त्याचा जिवास, शरीरास, प्रपंचास काहीच उपयोग पडत नाही, केवळ वादविवादच करण्यास व लोकांस तमाशा दाखविण्यास मात्र उपयोगी आहे.
 यास्तव मला हे पंडित बहुरूपी, सोंगाडी व चित्रकथी याहून बरे दिसत नाहीत. बारा-पंधरा वर्षेपर्यंत व्याकरण किंवा न्याय यांचे अध्ययन करतात. म्हणजे त्यांस पंडितपणा प्राप्त होतो. परंतु त्यांची विद्या अशी असते की, एकाने म्हणावे या शब्दाचे अंती 'च' असावा; दुसऱ्याने म्हणावे 'चा' असावा. याजविषयींचा वाद शेकडो प्रमाणे दाखवून सर्व दिवसभर करतात. शेवटी निश्चय एकाचाही होत नाही. तसेच नैय्यायिक हेही भांडतात. एक म्हणतो ईश्वर आणि जीव एक आहे. दुसरा म्हणतो, दोन्ही विभक्त आहेत. तिसरा म्हणतो, ईश्वर गुणी आहे. चवथा म्हणतो निराकार आहे. याप्रमाणे रिकामा वाद चालविण्यात जन्म घालवितात आणि त्यांस वादातील सत्य काय आहे, हे समजण्याची इच्छा नसते. परंतु परस्परांपेक्षा श्रेष्ठ कोण होतो, हे पाहण्याकरिता भांडतात आणि मग त्या वादात सत्यानेच भाषण करतात, असे नाही. मनास येईल तशी कल्पना, कपट, युक्ती, मूर्खपणा इत्यादी योजून सरासरी फार बोललेसे करतात. त्यांस कोणी म्हणतात, असे निर्फळ वाद घालण्याच्या ज्या ज्या विद्या शास्त्री शिकतात, त्यापासून इहलोकी व परलोकी हित नाही. आपले जिवाचेही कल्याण नाही व दुसऱ्याचे जिवाचेही नाही.
 एक व्याकरण म्हणावयास बारा-चवदा वर्षे लागतात. त्याचे कारण हेच आहे की, त्या प्रकरणी वाद करण्यास शिकतात; ग्रंथ पाठ करतात व प्रतिष्ठेकरिता वाद करतात. हे सर्व शास्त्री, पंडित या प्रकारचे आहेत. त्यांस व्यावहारिक ज्ञान नाही. त्यांस मोडीचे लिहितादेखील येत नाही व कोणतेही काम करावयाचे हे उपयोगी नाहीत. बरे, इतके असून यांची वर्तणूक पाहिली तर फारच वाईट. सामान्यतः हे गोंधळी, भट याप्रमाणेच व्याजस्तुती करून गृहस्थास भुलवून पैका काढणारे लोक आहेत. प्रातःकाळी उठले, म्हणजे यांचा प्रथम उद्योग हाच आहे की, गृहस्थाचे घरी जाऊन त्यांची स्तुती करावी. त्यामध्ये त्याचे जसे वर्णन पाहिजे तसे करून दोन पैसे निघाले, म्हणजे त्यांचे कार्य