पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११६ : शतपत्रे

संपादन करतो. नंतर त्याचे विभाग पश्चात किंवा केव्हा तरी होतात. तेव्हा त्यातील एक विभाग अयोग्य पुरुषाच्या हाती लागतो, म्हणून कोणी जर असे म्हटले की, हे सर्व मूर्खपणाने संपादन केले आहे, तर ही गोष्ट सत्य नाही.
 कारण की वाटणीत ही चूक आहे; परंतु संपादनात मूर्खपणा नाही. मिळविणाराने शहाणपणानेच मिळविले आहे. तसे इंग्रज लोकांनी सर्वांनीच पराक्रम केला असे नाही किंवा सर्व शहाणे आहेत, असेही नाही; परंतु त्यांच्यातून जे शहाणे निघाले, त्याणी पुढारी होऊन कवाईत व युद्धविद्या काढली आणि पुढे हिंदुस्थानात आले. त्यात जे शहाणे पुरुष एलफिस्तनसाहेबाप्रमाणे किंवा हेस्टिंगसाहेबाप्रमाणे झाले, त्याणीं पराक्रम केला. आणि जातेसमयी आपले लोकांचे हाती अधिकार दिला आणि सांगितले की, तुम्ही आता याची वहिवाट करा. त्या वहिवाटीवर कोर्ट डैरेक्टर व गवरनरादिक आहेत ते त्या पराक्रमाचे फलाचे लोकांस हिस्से देत आहेत. कोणास जड्ज, कोणास कलेक्टर नेमतात. त्यांनी एखादा हिस्सा भिडेने मूर्खास दिला. म्हणून मूर्खपणाने हा पराक्रम मिळविला, असे सिद्ध होत नाही. याजकरिता ही समजूत आमचे लोकांची मुख्य पडली पाहिजे. शहाणपणाशिवाय काही पराक्रम नाही.
 यास्तव हिंदुस्थानात असे कोणी लोक प्रमुख होऊन त्याणीं सर्व आपले लोकांस बलवान व शहाणे करून ठेविले पाहिजेत. त्यांस नवीन द्रव्योत्पत्तीचे मार्ग दाखविले पाहिजेत. इंग्रजांनी राज्य बलात्काराने घेतले, असे असले तर असो; परंतु व्यापार तर बलात्काराने घेतला नाही ? त्यातच हे लोक का शहाणे होत नाहीत ? इकडे काच करता येईल व तारवे करता येतील. लोखंडाचा रस करता येइल. भूमीतला कोळसा सापडेल. कापड करिता येईल. इतक्या गोष्टी समजून आल्या म्हणजे किती कार्य झाले ? व हे लोक किती बलवान होतील ? याप्रमाणे प्रथम असेच होऊ द्या की, सर्व व्यापाराचा माल इकडेच व्हावा. विलायती नको. इंग्रजास इकडील कच्चा माल खरेदी केल्याशिवाय निर्वाह नाही. यास्तव अशी गोष्ट केल्यानंतर राज्य मात्र त्यांचे हाती राहील. राहिले तर काय चिंता आहे ? जो पैसा तिकडे नेतील तो आपण जिन्नस देऊन खरेदी करून परत आणू; परंतु या गोष्टीस शहाणपण असून सर्व लोकांचे काम डोकीवर घेणारे पाहिजेत. असे लोकांचा फार तोटा आहे.

♦ ♦