पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ११५

 आता पृथ्वीवर दुसरे अनेक देश आहेत. त्याची अवस्थाही फार वाईट आहे. रयत लोक इकडल्यापेक्षा तेथे दरिद्री आहेत; परंतु हे उदाहरण या देशास उपयोगी नाही. कारण की, हा देश पूर्वी कसा होता व हल्ली कसा आहे, ते पाहून विचार केला पाहिजे. किती एक लोक असे आहेत की, मुसलमानांचे राज्यास नाव ठेवीत नाहीत; परंतु इंग्रजांचे राज्य विशेषेकरून दरिद्रास कारण समजातात व त्यांस काही नवीन शहाणपणाची युक्ती सांगितली, तर ऐकत नाहीत आणि म्हणतात की आम्हास आजपर्यंत या युक्ती कोठे होत्या? आजपर्यंत आम्ही दुःखी नव्हतो; आता मात्र झालो, ते इंग्रजांमुळे झालो. यास्तव या युक्तीने आमचे दरिद्र जाणार नाही, इंग्रज जातील तर मात्र जाईल, असे समजून युक्तीस बहुत लोक अगदी मानीत नाहीत. फक्त हे राज्य वाईट, असे म्हणून संध्याकाळपासून उजाडेपर्यंत आणि उजाडल्यापासून सारा दिवसभर जप करतात.
 या प्रकारचे लोक आम्ही नित्य पाहतो. तेव्हा अशा लोकांची समजूत पाडणे हे सर्वांहून अवघड आहे. परंतु पहा की, असा विचार करीत बसणे मूर्खपणाचे आहे. उद्योगास झटणे हा शहाणपणा आहे. दरिद्र आहे खरे व ते पदोपदी वृद्धिंगत होत चालले आहे. द्रव्याचे साधन कमी होत चालले आहे; परंतु अशा जपाने उपाय होणार नाही. जर विद्या व ज्ञान येणेकरून आपले दरिद्र कमी केले, तरच होईल. ज्ञान जेथे आहे, तेथे सर्व पराक्रम आहे. परंतु हिंदू लोकांमध्ये एकमत असेल तर या गोष्टी घडतील. आपलेपासून आपली कंठाळ एखादा घेऊन गेला, तर जाग्यावर बसून शिव्या दिल्या तर कंठाळ येईल की काय ? यास्तव जे नेणारे आहेत, ते परत देण्यास अनुकूल करण्याचे जे प्रयत्न असतील, ते करावे. ते तरी शहाणपणाखेरीज कसे सापडतील, यास्तव शहाणपण मुख्य पाहिजे. त्याचे योगाने दरिद्र कमी होईल.
 या देशातील लोकांनी विलायतेस जावे, तेथे वस्ती करावी. विद्या शिकावी. जे श्रीमान आहेत, त्याणीं या कामात द्रव्य खर्चावे, तिकडील ज्ञानाची वृद्धी करावी. तिकडील कलाकौशल्य इकडे आणावे; आपल्या दुष्ट चाली सोडाव्या, हेच शहाणपण आहे. या शहाणपणाने या लोकांस समर्थता येईल. आणि समर्थतेनंतर दरिद्र जाईल. मुख्य ज्ञानापासून सर्व पराक्रम आहेत. कधी कधी ज्ञानाबरोबर लागलेच पराक्रम दृष्टोत्पत्तीस येत नाहीत. कारण की, किती एक मूर्ख असून, अधिकार पावतात, तेव्हा त्यास अधिकार कसा मिळाला ? हा प्रश्न बहुतेक हिंदू लोक करतात; परंतु हा केवळ पोरकट प्रश्न आहे. पराक्रमाची रीती अशी आहे की, जो कोणी घरात प्रमुख शहाणा असतो, तो बहुत द्रव्य