पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११४ : शतपत्रे

काढून त्यांची वाटाघाट करीत आयुष्य घालवितात. जोपर्यंत बाहेरचे देशांतील वर्तमान लोकांस ठाऊक नव्हते, तोपर्यंत याच ज्ञानाचा थोरपणा होता व हे ज्ञान ज्यापाशी होते, त्यांस थोर मानून त्याचे पायाचे तीर्थ घ्यावे, येथपर्यंत मजल आली.
 परंतु आता बाहेरचे ज्ञान या देशात शिरले. त्याचे पुराने हे जुने ज्ञान वाहून गेले. त्याची तुच्छता अगदी स्पष्ट झाली. पाठीमागून हे पोकळ ढोंग चालत आले. त्याचा पोकळपणा उघडकीस येऊन त्या ढोंगावर पोट भरणारे त्यांचे महात्म्य कमी झाले. तर आता ज्यांस थोरपणा पाहिजे असेल, त्याणीं सांप्रत काळचे ज्ञानाची संपदा मिळविण्याचा प्रयत्न करावा. ज्या ज्ञानाने आपल्यावर इतर लोकांनी सरशी केली, ते ज्ञान आपण धिक्कारू नये; कारण की, त्याचा आपणास अनुभवच आला आहे. याजकरिता सावधगिरीचे लक्षण हेच की, काळास ओळखून त्याप्रमाणे चालावे. असे न केले तर फार फजीत होऊन दुर्दशा झाली आहे, त्यापेक्षा अधिक होण्याचा संभव आहे. पूर्वी जुन्या काळचे ब्राह्मण म्हणजे ऋषी वगैरे यांनी अपुरती कामे ठेविली ती आपण पुरती करावी. त्यांनी वैद्यकत्व पूर्णत्वास आणले नाही. तर आता आपण अनेक देशच्या कल्पना एके ठाई करून ते सुधारावे म्हणजे खरा थोरपणा मिळेल. व लोकांचे हित होईल. असे न होईल तर लोक वैद्यास सोडून नवे डॉक्टर व नवीन इस्पितळे यांचा आश्रय करतील; आणि पुराणे वैद्य बिचारे उपाशी मरतील. याप्रमाणे सर्व विद्येचे आहे.

♦ ♦


ज्ञान हाच पराक्रम

पत्र नंबर ८५ : ९ डिसेंबर १८४९

 सांप्रत काळी हिंदू लोक गरीब आहेत व अज्ञानी आहेत, तद्विषयी मी सिद्धान्त लिहितो की, संपदा आणि ज्ञान ही दोन्ही, जोपर्यंत यास आपली स्थिती कळली नाही तोपर्यंत प्राप्त होणार नाहीत. जरी हा देश उत्तम प्रकारचे उत्पन्न करणारा व धनधान्यसमृद्धिकर्ता आहे, तरी या लोकांस त्याचे फळ नाही.