पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ११३

प्रमाणास हा ग्रंथ, तो ग्रंथ, प्रत्यक्ष श्रुति, स्मृती अशा तो काढून दाखवितो व यज्ञ करणारास थेट स्वर्गात नेऊन पोचविणारा तो मीच असे मानतो.
 बरे, आता संस्कृताचे चौथे भागात जाऊ. कोरी धर्मशास्त्र पढला. तर त्यात शंभर ग्रंथ श्राद्धाबद्दल, पन्नास ग्रंथ शौचनिर्णयाबद्दल, पंचवीस ग्रंथ संस्काराबद्दल, असे अनेक निरुपयोगी विषयांविषयी वादविवाद पाहून, त्यात तो आपणांस मोठा धन्य मानितो. श्राद्धास पदार्थ किती असावे नसावे, कोणते भट किती असावे, दक्षणा किती असावी, तीथ कोणती, काळ कोणता, तीळ किंवा तांदूळ असावे, दर्भ किंवा दुर्वा, द्रोण पालथा ठेवावा की उताणा, कोणत्या दिशेस बसावे, आधी देवास की आधी पितरांस गंध लावावे ही सर्व कवाईत त्यांस पाठ होते. आणि त्यातील वाद त्यांस ठाऊक होतात. त्याविषयी बोलण्यास तो मोठा उत्सुक होतो, त्याची त्यांस मोठी हौस येते. कोठे श्राद्ध असले तर तेथे आपली तो शेखी मिरवितो आणि दोनचार आणे मिळवून घरास आणितो.
 बरे, संस्कृतविद्येच्या पाचवे भागात आपण शिरू, विद्यार्थी न्याय, व्याकरण, मीमांसा पढला तर मग हे जग दिसते हे खरे किंवा खोटे, याचीच भ्रांती त्यांस पडून त्याविषयी तो वाद घालीत बसतो. कोणी म्हणतो, दहा पदार्थांनी सृष्टी घडली तर कोणी म्हणतो चोवीस, कोणी म्हणतो सात; कोणी म्हणतो मी आणि ईश्वर एकच जातीचे, मध्ये भाषा मात्र आहे. कोणी म्हणतो सुखदुःख हे मनातही आणू नये, आळसात बसावे. प्रारब्धी आहे ते घडतच आहे. या मानसिक कल्पनेच्या जालात तो सापडून वेडा होतो.
 बरे, सहावे भागात पाहू. जर तो ज्योतिष शिकला, तर म्हणू लागतो, अमुक ग्रह आला तो पीडा करील. मंगळास अमुक दान पाहिजे. शनी सूर्याचा मुलगा, परंतु मोठा द्वाड ग्रह, त्याचा जप केला असता शांती होते. त्याचे डोकीवर तेल ओतावे किंवा ब्राह्मणास लोखंड द्यावे; परंतु हे मोठे उग्र दान आहे. कोणी घेणार नाही. प्रश्न सांगतो, पुढले भविष्य, आयुष्य, रोग, शत्रुसंप्रदायाविषयी नाना प्रकारचे भ्रम लावितो.
 याप्रमाणे कोणतेही भागात जरी पाहिले. तरी संस्कृतविद्या निरुपयोगी व नाना प्रकारचे कुतर्क उत्पन्न करणारी व संसारावरील चित्त उडवून आळशी करणारी, निरुपयोगी कर्मे करणारी आहे. सांप्रत काळी जे ज्ञान पाहिजे, ते त्यात मुळीच नाही. सांप्रत काळचे देश, तेथील राज्ये व फौजा व व्यापारी इत्यादिकांची माहिती, यंत्राची उत्पत्ती, कायदेकानू कसे असावे, गैरचाली कोणत्या आहेत, टाकाव्या कोणत्या ठेवाव्या कोणत्या, हे त्यांस माहीत नसते. दोनचार हजार वर्षांपाठीमागे पिकलेले वेड वगैरे समजुती व वाकडे तर्क हेच आता