Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/९२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६५
मरहट्ट सम्राट सातवाहन
 

पश्चिम माळवा जिंकला होता. याने पूर्व माळवाही जिंकला. विदिशेला (भिलसा ) एका शिलालेखात सातकर्णीचा उल्लेख आहे तो याचाच असावा असे पंडितांचे मत आहे. साची येथील महाद्वारावर सातकर्णीच्या पदरी असलेला शिल्पकार वसिष्ठीपुत्र आनंद याचा दानविषयक एक लेख कोरलेला आहे. त्यावरून तेथपर्यंत सातवाहनसत्ता स्थिर झाली होती असे दिसून येईल. डॉ. केतकरांच्या मते, प्रयागजवळच्या उत्खननात सापडलेल्या मुद्रा- शिक्के- या सातवाहनांच्या व त्यांच्या अधिकाऱ्यांच्या आहेत. तसे असले तर सातवाहनसाम्राज्य तेथपर्यंत पोचले होते असा अर्थ होईल. पण त्या मुद्रा वाकाटकांच्या आहेत असे डॉ. जयस्वाल यांचे मत आहे. (प्राचीन महाराष्ट्र, भाग १ ला, डॉ. केतकर, पृ. ३९९.)

वीर विक्रम ?
 कालकाचार्यांच्या कथेतला वीर विक्रम म्हणजे हा दुसरा सातकर्णीच होय असे गाथासप्तशतीचे संपादक स. आ. जोगळेकर यांचे मत आहे. कालक हे जैन आचार्य. ते धर्मप्रसारार्थ उज्जयिनीस आले असता तेथील राजा गर्दभिल्ल तथा गंधर्वसेन याने त्यांची बहीण सरस्वती हिचे हरण केले. तिची सुटका करण्याचे सर्व प्रयत्न विफल झाल्यावर आचार्यांनी शकराजांना उज्जयिनीवर स्वारी करण्यासाठी निमंत्रण दिले. ( भारतीयांनी हीच परंपरा आजपर्यंत अखंडपणे चालविली आहे. ) त्याप्रमाणे बोलनघाटातून येऊन शक उज्जयिनीवर कोसळून पडले, त्यांनी गंधर्वसेनाचा नाश करून सरस्वतीची सुटका केली. पण काम झाल्यावर ते परत जाईनात. त्यांनी माळव्याचे राज्य बळकावले व प्रजेवर ते अनन्वित अत्याचार करू लागले. कालकाचार्यांचीही ते अप्रतिष्ठा करू लागले. तेव्हा त्यांचा उच्छेद करण्याच्या हेतूने सातवाहन राजाची मदत मागण्यासाठी आचार्य प्रतिष्ठानास आले. सातवाहन राजाने त्यांची मागणी मान्य केली व सेना घेऊन तो माळव्यात गेला व त्याने मालवगणांच्या मदतीने शकांना पिटाळून लावले. हा सातवाहन राजा म्हणजे दुसरा सातकर्णी होय, असे जोगळेकर म्हणतात. त्यांच्या मते मूळ कथेतला वीर विक्रम तो हाच होय. मात्र संवतकर्ता जो विक्रमादित्य त्याच्याशी ते याचा संबंध जोडीत नाहीत.
 सातकर्णीने कालकाचार्यांच्या विनंतीवरून माळव्यात जाऊन शकांचा उच्छेद केला या घटनेला थोडा विश्वसनीय पुरावा सध्या उपलब्ध झाला आहे. जैनांचे पर्युषणपर्व श्रावणात असे ते कालकाचार्यांनी बदलून भाद्रपदात आणले असा इतिहास आहे. 'युग प्रधानस्वरूप ' या जैन ग्रंथाप्रमाणे हे कालकाचार्य इ. स. पू. १७१च्या सुमारास होऊन गेले. दुसऱ्या सातकर्णीचा हाच काळ आहे. आणि जैन कालकाचार्यकथेप्रमाणे हेच आचार्य प्रतिष्ठानला सातवाहन राजाकडे आले होते. यामुळे जोगळेकरांचे अनुमान खरे असावे असे वाटते.
 पहिल्या सातकर्णीविषयीही जोगळेकरांनी थोडी निराळी माहिती दिली आहे. त्यांच्या