मते पुष्यमित्राने मिनँडर - मिलिंद - या बौद्धधर्मी ग्रीक राजाचा पराभव केला व त्याला सीमापार केले, त्या वेळी त्याला या सातकर्णनि साह्य केले होते. पहिल्या सातकर्णीचा मृत्यू इ. पू. १८५ या साली झाला असे वर दिले आहे. पुष्यमित्राचा उदय त्यानंतर एक वर्षाने म्हणजे इ. पू. १८४ साली झाला व त्याने मिनेडरचा उच्छेद इ. पू. १७५ साली केला असे एक मत आहे. तेथपर्यंत सातकर्णी जिवंत होता असे जोगळेकर मानतात.
कुलव्रत
जोगळेकरांचे मत मान्य केले तर परकी आक्रमकांचा उच्छेद करणे हे सातवाहन कुलाचे प्रारंभापासूनच व्रत होते असे दिसून येईल. पहिल्या सातकर्णीने वर सांगितल्याप्रमाणे माळव्यात जाऊन शकांचे निर्दाळण केले आणि इ. सनाच्या पहिल्या शतकात गौतमीपुत्र सातकर्णीने महाराष्ट्रातील शकसत्ता नाश करून टाकिली हे तर सर्वमान्यच आहे. सातवाहनकुलाचे हे वैभव अपूर्व होय यात शंका नाही.
हाल - गाहासत्तसई
दुसरा सातकर्णी हा सहावा सातवाहन राजा होय. त्यानंतर पुढच्या १४ राजांनी नावे पुराणात आहेत. पण लंबोदर, आपीलक व कुंतल सातकर्णी यांच्या त्रोटक माहितीपलीकडे पुराणांनी काहीच दिलेले नाही. पण मधल्या एकदोन राजांची माहिती नव्याने उपलब्ध झाली आहे. उत्तरेन शुंगसत्ता इ. पू. १८० ते इ. पू. ७२ पर्यंत होती. शुंगांना एका सातवाहन राजानेच सत्ताच्युत केले, असे एक मत आहे. हा सातवाहन म्हणजे पूर्णाेत्संग असावा असे जोगळेकर म्हणतात. शुंगानंतर काण्व वंशाने ४५ वर्षे म्हणजे इ. पू. २७ पर्यंत मगधावर राज्य केले. त्या साली सातवाहन सम्राटाने काण्वांना पदच्युत करून आपली सत्ता स्थापन केली. हा सम्राट बहुधा पुलुमायी असावा. पुराणांनी मगधापर्यंत साम्राज्यविस्तार करण्याचे श्रेय सिमुकाला म्हणजे सातवाहन सत्तेच्या मूळ संस्थापकाला दिले आहे, पण ते चूक आहे. कारण सिमुकाचा काळ यापूर्वी दोनशे वर्षांचा आहे. म्हणून त्या वेळचा सम्राट पुलुमायीच असावा असे वाटते. त्यानंतरचा प्रसिद्ध सातवाहन सम्राट म्हणजे हालराजा होय. याचा काळ इ. स. २१ असा मानला जातो. सातवाहनांविषयी कसलीच गंधवार्ता नव्हती तेव्हा याचे नाव मात्र संस्कृत व प्राकृत साहित्यात गाजत होते. त्याचे कारण म्हणजे त्याने रचलेला गाथासप्तशती - गाहासत्तसई - हा काव्यग्रंथ होय. कवी कोऊहलाने रचलेला महाराष्ट्री प्राकृत भाषेतील काव्याचा - लीलावईचा - हाच नायक होय हे मागे सांगिलेच आहे. त्या काव्यात त्याच्या पराक्रमाचे वर्णन आहे, पण ते सर्व अद्भुतात जमा होणारे व दंतकथांवर आधारलेले आहे. इतिहासात त्याला स्थान देता येणार नाही. हालाच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचे वर्णन सातवाहनकालीन साहित्याच्या वर्णनात येईलच.
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/९३
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
६६