आहे, त्यावरून सातवाहन हे वैदिकधर्मीय व हिंदु परंपरेचे अभिमानी होते हेच दिसून येते. त्या लेखात इन्द्र, संकर्षण, वासुदेव यांना प्रारंभी नमन आहे. नंतर यम, वरुण, कुबेर, वासव यांना नमन आहे. वर ज्या यज्ञांचा उल्लेख केला आहे त्यांत प्रत्येक वेळी ब्राह्मणांना किती गायी, अश्व व धन दक्षिणा दिली ते नमूद केलेले आहे. यावरून याविषयी संशयाला जागा कोठे राहात नाही.
नायनिका
सातकर्णीची राणी देवी नायनिका हिची म. म. मिराशी हे भारतवर्षातील महनीय स्त्रियांत गणना करतात. महाराष्ट्रात त्या वेळी अनेक नागसरदार होते. ते महारठी ही पदवी धारण करीत. सिमुक सातवाहनानेच त्यांना या पदव्या दिल्या होत्या, हे वर सांगितलेच आहे. अशाच एका महारठी त्रणकयिरो नावाच्या सरदाराची नायनिका ही कन्या होती. वेदिश्री, सतिश्री, हकुश्री या तिच्या पुत्रांचे पुतळेही नाणेघाटात आहेत. सातकर्णी मृत्यू पावला त्या वेळी कुमार वेदश्री हा लहान होता. त्यावेळी आपल्या पित्याच्या साह्याने देवी नायनिकेने साम्राज्याचा कारभार उत्तम चालविला. पतिनिधनानंतर तापसीव्रताने ती राहात असे, असे शिलालेखात तिने वर्णन आहे. तापसीव्रताने राहून राज्यकारभार करणाऱ्या या महाराणीचे वर्णन वाचून देवी अहल्याबाईचे वाचकांना सहज स्मरण होईल.
पुष्यमित्र शुंग
सम्राट श्री सातकर्णी इ. पू. १८५ या वर्षी मृत्यू पावला. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १८४ साली मगधात राज्यक्रान्ती झाली. अशोकानंतरचे राजे दुबळे व प्रतिकारशून्य असल्याने साम्राज्याची वाताहात होत होती आणि सर्वत्र बजबज माजून प्रजेत अत्यंत असंतोष निर्माण झाला होता. यावनी आक्रमणाची भीती तर सारखी वाढतच होती. अशा वेळी पुष्यमित्राचा उदय झाला. तो मौर्यसम्राट बृहद्रथ याचा सेनापती होता. एकदा संचलनाचे वेळी उठावणी करून त्याने बृहद्रथाला ठार मारले व आपण सम्राटपद धारण करून आपल्या शुंगवंशाची स्थापना केली. या पुष्यमित्राने खुद्द पाटलीपुत्रातच अश्वमेध केला व दुबळ्या, निवृत्तिप्रधान बौद्धधर्माला बाजूस सारून वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. या शुंगवंशाने इ. पू. १८४ ते इ. पू. ७२ असे ११२ वर्षे राज्य केले.
विदिशेपर्यंत
पहिल्या सातकर्णीनंतर तेवढाच पराक्रमी सातवाहन राजा म्हणजे दुसरा सातकर्णी हा होय. त्याने इ. स. १६६ पासून इ. पू. १११ पर्यंत म्हणजे ५६ वर्षे राज्य केले; आणि सातवाहन साम्राज्याला दृढता व स्थैर्य प्राप्त करून दिले. पहिल्या सातकर्णीने
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/९१
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
६४