Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३७
स्वराज्याचे साम्राज्य
 

पायबंद घालणे हे आपल्याला शक्य नाही, तेव्हा त्यांच्याशी आपण सलोखा करावा, बाजीरावाला भेटीस बोलवावे आणि बादशाही साम्राज्याच्या रक्षणाची त्याच्यावरच जबाबदारी टाकावी. पण दुसऱ्या पक्षाला यात नामर्दपणा वाटत होता. आमच्या हाती सत्ता द्या, आम्हांला माळव्याची सुभेदारी द्या, निजामाला आपल्या साह्याला बोलवा म्हणजे आम्ही मराठ्यांना सहज जागी बसवू, असे हा पक्ष बादशहाला सांगत असे. बादशहाला कधी यांचे खरे वाटे, तर कधी त्यांचे. आणि मग त्या त्या मताप्रमाणे तो नेमणुका करी. पण दुसऱ्या पक्षाच्या लोकांच्या हाती सत्ता व सुभेदारी देऊन काहीच उपयोग झाला नव्हता. दर वेळी मराठ्यांनी त्यांना नामोहरम केले होते. त्यामुळे बादशहाची डळमळ होई, तो पुन्हा जयसिंहाच्या पक्षाला वळे. तसा तो एकदा वळाला आणि त्याने बाजीरावास भेटीस बोलावण्याचे ठरविले. पण त्यामुळे मुस्लिम पक्षात प्रचंड खळबळ माजली आणि सर्व मुस्लिमविश्व मराठ्यांच्या प्रतिकारार्थ सिद्ध झाले, तेव्हा या सर्व प्रकरणाचा कायमचा निकाल लावावयाचा अशा जिद्दीने बाजीराव १७३५ च्या धनत्रयोदशीला दक्षिणेतून निघाला.

राजपुतांना जिंकले
 या उत्तर दिग्विजयासाठी दोन मोहिमा कराव्या लागल्या. रजपूत संस्थानिकांच्या भेटीगाठी घेऊन, त्यांच्याशी दृढ संबंध जोडून, त्यांची एक आघाडी उभी करणे हे पहिल्या मोहिमेत साधले. माळव्यामध्ये मराठ्यांनी उत्तम व्यवस्था लावून रयतेची आबादानी केली होती. त्यामुळे मोगलांपेक्षा मराठ्यांची सत्ता जास्त हितावह आहे हे रजपूत सरदारांना आणि रयतेलाही कळून चुकले. आणि ते सर्व मराठ्यांना अनुकूल झाले. त्यामुळे बाजीराव उदेपुरास पोचेपर्यंत वाटेत अनेक राजपूत सत्ताधीशांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. उदेपूर हे मुख्य संस्थान. तेथला राणा जगत् सिंह याने बाजीरावाच्या स्वागतासाठी सुवर्ण सिंहासन केले होते. पण बाजीरावाने सांगितले की खरे चक्रवर्ती आपण आहांत, तो मान आपला आहे. असे म्हणून तो दुसऱ्या खालच्या आसनावर बसला. या कृत्यामुळे त्याने सर्व राजपुतांची मने जिंकली आणि हिंदुपदपातशाहीच्या सिद्धीचे एक पाऊल पुढे पडले.
 याच वेळी बादशहाशी तह व्हावयाचा होता. २० लाख रुपये नक्त, ४० लक्षांची माळव्यात जहागीर, आणि भोपाळकरांचे मुलखात तनखा, असा तह करण्याचे बादशहाने मान्य केले होते. पण वाटाघाटीचा घोळ संपला नाही. मुस्लिम सरदार आणि निजाम यांनी पुनः पुन्हा विरोध केला आणि यातच मे महिना उजाडल्यामुळे बाजीरावाला परत फिरावे लागले. तेव्हा त्या वेळी परत फिरून तो १७३६ च्या नोव्हेंबरात निघून १७३७ च्या जानेवारीत भेलशाला आला.