चलो दिल्ली
ही मोहीम अगदी जगड्व्याळ होही. १००० मैल लांब व ५०० मैल रुंद एवढ्या विस्तृत प्रदेशात युद्धाचा भडका झाला होता. भेलसा, भोपाळ, वोडशा, दतिया, भदावर, अटेर, दुआब व शेवटी दिल्ली असे हे संग्राम झाले. प्रत्येक ठिकाणी मराठ्यांना विजय मिळाला. एकदा दुआबात मात्र त्यांचा पराभव झाला. पण तेवढ्यावरून, सादतखानाने आपण मराठ्यांना बुडविले, अशी बादशहापाशी फुशारकी मारली. बादशहालाही ते खरे वाटून त्याने त्याचा मोठा गौरव केला. पण चारपाच दिवसांतच २८ मार्च १७३७ ला बाजीराव दिल्लीवर जाऊन कोसळला; तेव्हा त्याचा भ्रमनिरास होऊन पळून जाण्यासाठी त्याने यमुनेत नावाही जमविल्या. त्याने प्रत्यक्ष लढाई का केली नाही ? बाजीरावासारख्या भुरट्या चोराचे अंगावर स्वतः बादशहाने जाणे शोभत नाही, असे त्याच्या सरदारांचे मत पडले !
या वेळी बाजीरावाने दहा दिवस अहोरात्र प्रवास करून दिल्लीवर घाला घातला होता. मराठे बुडाले नाहीत, मराठे आहेत, हेच त्याला दाखवावयाचे होते. दिल्ली मारावी असा या वेळी विचारच नव्हता. ते शक्यही नव्हते. पण मराठ्यांचा दणका बादशहाला कळला म्हणजे त्याचे व सरदारांचे डोळे उघडतील हा यातील हेतू होता. तो सिद्ध झाल्यामुळे बाजीराव लगेच परत फिरला. वाटेत एकदोन संग्राम झाले. ते जिंकून पावसाळ्याच्या प्रारंभी तो दक्षिणेत परत आला.
त्याला अडविण्यासाठी वाटेत निजाम आडवा आलेला होता. पण त्याला चुकवून बाजीराव निसटून खाली आला. त्या वेळी त्याच्याशी संग्राम करणे सोयीचे नव्हते. सैन्य सर्व थकलेले होते. म्हणून पावसाळा दक्षिणेत काढून बाजीराव १७३७ च्या ऑक्टोबरमध्ये परत उत्तरेत आला.
भोपाळ - निजाम
या वेळी उभयपक्षांची फार जंगी तयारी होती. या वेळी बादशाही तारणारा एक काय तो निजाम, असे बादशहाला वाटत होते. म्हणून त्याला दिल्लीला बोलावून बादशहाने त्याचा मोठा गौरव केला. आणि मोठी फौज व मुबलक पैसा घेऊन, माळव्यातून मराठ्यांना कायमचे हाकलवून देतो अशी प्रतिज्ञा करून, निजाम बुंदेलखंडात शिरला. तसे झाले असते तर चाळीस वर्षांचा मराठ्यांचा उद्योग फुकट जाईल हे जाणून बाजीरावही ऐंशी हजार फौज घेऊन, निघाला आणि भोपाळवर त्याने निजामाला कोंडले. त्याचा पुत्र नासिरजंग दक्षिणेतून त्याच्या मदतीला निघाला होता. त्याला वाटेतच चिमाजी आप्पाने अडवून ठेवले. दिल्लीहून येणाऱ्या फौजांचा शिंदे होळकरांनी नाश केला, सुजायतखान येत होता त्याला रघुजी भोसले याने ठार केले. तेव्हा निजामाचा नाइलाज झाला आणि शरणागती पतकरून तो तहास तयार झाला.
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५३८