जांच्या धर्मछळाला कोकणातील हिंदू लोक कंटाळून गेले होते. तेव्हा मग कोकणचा सोक्षमोक्ष करावयाचे ठरले. आणि वसईची मोहीम मुरू झाली. आणि १७३८ च्या डिसेंबरात चिमाजी आप्पा कोकणात उतरला. त्या आधीच ठाण्याचा किल्ला मराठयांनी घेतला होता. त्यामुळे त्यांची बाजू बळकट झाली होती. चिमाजी आप्पा आल्यावर माहीम, तारापूर, वेसावे, मढ अशा अनेक लढाया झाल्या, त्या सर्व मराठ्यांनी जिंकल्या. त्यात माहीम व तारापूर हे संग्राम फार निकराचे झाले. त्यामुळे मराठयांचे मनोधैर्य वाढले. आणि वसई घेणे त्यांना सुलभ झाले. वसईचा वेढा तीन महिने चालू होता. याच वेळी गोव्याकडून काही मदत येऊ नये म्हणून आप्पाने व्यंकटराम यास तिकडे पाठविले होते. तेथे त्याने मोठा पराक्रम करून गोवा पादाक्रांत करण्याची वेळ आणली होती. वसईला पोर्तुगीजांनी लढण्याची शिकस्त केली. पण त्यांचे काही चालले नाही. शरणागती पतकरून त्यांना किल्ला मराठयांच्या हवाली करावा लागला. या विजयामुळे उत्तर कोकण संपूर्णपणे मराठ्यांच्या हाती आले. आणि एका पाश्चात्य सत्तेला ते नामोहरम करू शकतात असा त्यांचा लौकिक झाला. त्यामुळेच इंग्रजही नरम आले. त्यांनी बाजीरावाची मर्जी संभाळण्यासाठी चौल हे महत्त्वाचे ठिकाण त्याच्या ताब्यात दिले. यामुळे बाजीरावाचा आपल्यावरील वहीम नाहीसा होऊन मुंबईचे संरक्षण होईल, अशा अर्थाचा मुंबई कौन्सिलने ठरावच केला.
मराठ्यांचे बळ काय होते, याची यावरून कल्पना येईल. त्यांना दुहीने पोखरले नसते, शाहू छत्रपती स्वतः मराठ्यांचे नेतृत्व करीत असते, स्वतः ते मोहिमा करीत असते आणि कठोर शिस्त या देशाला त्यांनी लावली असती तर हिंदुस्थान जिंकणे मराठ्यांना अवघड नव्हते.
उत्तर दिग्विजय
१७३७ च्या मार्चमध्ये पेशवा बाजीराव याने दिल्लीवर स्वारी करून जे अपूर्व साहस केले आणि विजय मिळविला त्यावरून हे सहज दिसून येते. हा उत्तर दिग्विजय मराठयांनी माळव्यावर स्वारी केली, तेव्हापासूनच सुरू झालेला होता. मध्यंतरी इतर उद्योग निघाल्यामुळे त्याला जोर चढला नव्हता. १७३२ सालापासून त्या राजकारणाला पुन्हा जोर चढून १७३७ च्या दिल्लीस्वारीत त्याची परिणती झाली.
या स्वारीचे मुख्य कारण हेच होते की मराठ्यांचा उत्कर्ष मोगल बादशहाला आणि त्याच्या सरदार, सेनापतींना सहन होत नव्हता. बादशहा स्वतः दुबळा होता, अंगी पराक्रमही नव्हता आणि सारासार विचार करून निर्णय करण्याचे सामर्थ्यही त्याच्या ठायी नव्हते. त्याच्या दरबारात यामुळे दोन पक्ष झाले होते. सवाई जयसिंग आणि खान डौरान हा एक पक्ष आणि सादतखान, कमरुद्दिनखान व महंमदखान बंगष हा दुसरा पक्ष पहिल्या पक्षाचे म्हणणे असे की मराठ्यांचा मोड करणे, त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना नर्मदेच्या दक्षिणेस हाकलून लावणे; किंवा त्यांच्या पराक्रमास
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५३६