पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असहिष्णू वातावरणात आपणा सर्वांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. ते असे आहेत.
 ‘स्फूर्ती व ज्ञान प्राप्त होण्यासाठी माणसाला धर्माची गरज आहे, पण जर या कामी त्याला धर्मामुळे अडचण व्हायला नको असेल तर धर्माचीच पुनर्घटना झाली पाहिजे. आधुनिक लोकांना धर्म सुबोध होईल असा करणे व त्यात जे पोकळ अवडंबर माजले आहे, हेही नाहीसे करून तो आदरणीय वाटेल असा करणे आवश्यक नाही का? जगातील सर्व मोठ्या धार्मिक चळवळीचा प्रारंभ धर्माच्या अशा मूल्यपरिवर्तनानेच व धर्माला सर्वसुलभ करण्यानेच होत असतो. गौतमबुद्धाने आपल्या वेळच्या ब्राह्मणधर्मात जे परिवर्तन घडवून आणले ते त्या धर्माच्या सर्वसुलभ अंगावर भर देऊन व धर्मचर्चेसाठी प्राकृत लोकांची भाषा वापरूनच घडवून आणले. आजही धर्मातीत किती तरी व्याख्या बदलून नव्याने करण्याची वेळ आली आहे.'
 ‘प्रत्येक धर्माने आपल्यात इष्ट ती सुधारणा करावी व राष्ट्राचे बरे करण्यासाठी प्रत्येक धर्माने आपल्या भांडारातल्या जुन्या इलमा बाहेर काढाव्या.'
 ‘अज्ञान, स्वार्थ व जडवाद या मानव जातीच्या शत्रूशी झगडण्यासाठी आपण सौजन्याने व बंधुभावाने एकी करू या. धर्माची स्वरूपे भिन्न-भिन्न दिसत असली तरी धर्म ही वस्तू तत्त्वत: एकच आहे.'
 महाराजांचे हे विचार आज भारतातील धर्माच्या संदर्भात दोन समाजात जी दरी वाढताना दिसते, त्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक आहेत. त्याचे पालन गुजराथने व देशानेही करायला हवे.

 मित्रहो, मी विस्तृतपणे आजच्या परिस्थितीचे चित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामागे एक साहित्यिक म्हणून माझा काही एक उद्देश आहे. एक विचारवंतानं ‘कवी हा प्रेषित असतो' असं म्हणलं आहे. त्या अर्थाने लेखक-कलावंत हे। समाजासाठी मार्गदर्शक असतात. ते समाजपुरुषापुढे लेखनातून आरसा धरतात व त्याच्या चेहरयावर चढलेली व मनात घर करून असलेली काजळी व विद्रुपताकुरूपता दाखवतात व सांगतात की, ती कमी करीत आपला मूळचा मानवी चेहरा व सुंदर नैतिकता असलेलं विवेकी मन अधिक सुंदर - अधिक उजळ केलं पाहिजे. भारतीय संस्कृतीचं सार तीन शब्दांत सांगायचं झालं तर, ते ‘सत्य - शिव - सुदर असं सांगता येईल. सत्य कठोर असलं तरी, ते शिव म्हणजे अंतिमत: मंगलमय लोककल्याणी असतं म्हणूनच ते सुंदर असतं आणि म्हणूनच जीवनातील विषमता व द्वेषरूपी कुरूपता नष्ट करून ते सुंदर व शिव करणं हेच साहित्याचं नैतिक व सामाजिक प्रयोजन असतं. ते करण्याचा मी माझ्या कुवतीने आजवर केला आहे, व पुढेही करीत राहीन. त्यामुळे मला जो थोडा फार नैतिक अधिकार प्राप्त झाला असेल तर, तो वापरून मी माझ्या सहप्रवासी साहित्यिक - कलावंतांना समाजातली

२६ / ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन