पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

धर्मांना समान लेखणारं व केवळ हिंदू बहुसंख्याक म्हणून त्यांचं हिंदू राज्य असावं हे अमान्य असणारे विचार लेटर अॅण्ड स्पिरिटमध्ये उतरविणं व तसं वागणं याची आज कधी नाही एवढी गरज आहे आणि त्यासाठी 'प्यार की राह दिखा दुनिया को, रोके जो नफरत की आँधी | तुझमें ही कोई होगा गौतम, तुझमें ही कोई होगा गांधी ।' या प्रसिद्ध गीताप्रमाणे आपणही थोडे गौतमबुद्ध होत प्रेम व करुणेची कास धरू या. थोडं गांधी होत हिंदू-मुस्लीम ऐक्य व सर्वधर्मसमभावाचं वागण्या-बोलण्यातून आपल्या पुरतं तरी आचरण करू या. एका प्रसिद्ध शायरनं भारतमातेचा एक डोळा हिंदू तर दुसरा मुसलमान अशी कल्पना केली आहे. मी ती कल्पना विस्तारत असं म्हणतो की, दोन्ही डोळ्यांतून एकच वस्तू एकसंघ दिसते, तसंच आपण सान्यांनी एका डोळ्याच्या हिंदू नजरेनं व दुस-या डोळ्याच्या मुस्लीम नजरेनं पाहत समोरचा माणूस एकच व पूर्ण पाहू या. तो फक्त माणूस आहे, मग नंतर तो हिंद-मुस्लीम आहे...आज जागतिक स्तरावर वहाबी इस्लामी कट्टरवाद्यांचं आव्हान उभं ठाकलं असताना भारतीयांनी आपल्याच मुस्लीम बांधवांना आरोपीच्या पिंज-यात उभे न करता ते याच भूमीत आपल्यासारखेच जन्मलले व मरणारे भारतीय आहेत, असे मनापासून मानू या. तसे वागू या व त्याना दिलासा देऊ या.
 पुन्हा येथे मला महात्मा गांधींचा आणखी एक विचार सांगू द्या. ते म्हणतात,
 'All Religion proceeds from the same God, but all are imperfect because they have come down to us through imperfect human instrumentality.'
 अर्थात 'सर्व धर्म एकाच ईश्वरापासून निर्माण झाले आहेत, पण ते सारे अपूर्ण आहेत. कारण ते अपुर्ण माणसामार्फत आले आहेत, त्यांचा आणखी एक विचार असा आहे,
 "Hindus, if they want unity among differents races must have the courage to trust minorities.'
 अर्थात जर हिंदूंना विविध वंशपंथांत एकता हवी असेल तर त्यांनी अल्पसंख्याकांवर विश्वास ठेवण्याचे धाडस केले पाहिजे.
 आज देशात धर्म व विश्वासाच्या संदर्भात जे उन्मादी वातावरण आहे, त्यावर गांधी विचार हा अक्सीर अशी रामबाण उपाय आहे.

 सयाजीराव गायकवाड हे १९३३ साली शिकागोमध्ये भरलेल्या दस-या विश्वधर्म परिषदेचे उद्घाटक होते. १८९३ मधली पहिली धर्म परिषद स्वामी विवेकानंद यांनी गाजवली होती. त्यांच्याप्रमाणेच महाराजांनी दुसन्या विश्वधर्म परिषदेत अत्यंत मूलगामी भाषण करून सर्वधर्मभावाचा प्रभावी पुरस्कार केला व परखड धर्म चिकित्साही केली. त्यांच्या भाषणातील काही विचार आजच्या उन्मादी व

लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण / २५