पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संपादक श्रीराम पवार प्रभृती मान्यवरांच्या साहित्य कृतींची परीक्षणे यात आहे. बाबा आमटेंचा ‘ज्वाला नि फुले' काव्यसंग्रह आणि 'मी एस. एम.' आत्मकथेवरील यातील दीर्घ परीक्षण तुमच्या वाचनाच्या कक्षा रुंदावतील अशी माझी खात्री आहे. अन्य लेखकांचे ग्रंथही वाचण्याची प्रेरणा तुम्हास मिळेल. कारण त्यांचे स्वत:चे असे संदर्भमूल्य आहे. साहित्य, समाज, संगीत, संपर्क माध्यमे, राजकारण असा या ग्रंथाचा व्यापक पैस आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, कुष्ठरोग निर्मूलन, वयोश्रेष्ठांचे प्रश्न, वंचितांच्या समस्या अशा अंगांनी ही परीक्षणे, समीक्षणे तुमची मने संवेदनशील करतील असा मला विश्वास वाटतो. यातील चरित्रे, आत्मचरित्रे तुम्ही मिळवून वाचाल तर तुमचे अनुभव विश्व बदलून जाईल. मी एक सांगेन की ही सारी समीक्षणे मी आस्वादक समीक्षेच्या अंगांनी लिहिली आहेत. दोष दिग्दर्शन गौण. मी सकारात्मक व प्रोत्साहक समीक्षक आहे. वस्तुनिष्ठता म्हणजे सोनाराचा तराजू असे मी मानत नाही. पण तो लाकडाच्या वखारीतील तराजूही नाही हे मला सांगितलेच पाहिजे. ज्या वाचनाने समाज परिवर्तन घडून येईल अशा जाणिवेने केलेले हे लेखन होय. ‘फॅसिस्ट' व 'फ्युडल' दोन्ही कालबाह्य असल्याने त्यांच्या निरासाचा आग्रह या लेखनात आहे. आपण जात, धर्मनिरपेक्ष, अंधश्रद्धा मुक्त, विज्ञाननिष्ठ, समतावादी, झाल्याशिवाय तरुणोपाय नाही. हे कालभान देणारे सदर लेखन असल्याने वेचलेली फुले' हुंगली नि टाकली असे होणार नाही. यात असलेल्या अव्यक्त, अमूर्त विचार भुंग्यांचा गुंजारव एकदा का तुमच्या कानी घोंगावला की तो आजन्म तुमचा पिच्छा पुरवणारच. त्यामुळे वेचलेल्या फुलांचे वाचन शिळोप्याचा उद्योग ठरणार नाही. वॉल्ट व्हिटमननी म्हटल्याप्रमाणे 'Who touches the book, touches the heart' असे यातील ग्रंथ होत.

 २० एप्रिल २०१७
डॉ. सुनीलकुमार लवटे