पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/158

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

(१९९०), 'अतले अंतरिण' (१९९०), 'बलिकार गोल्लाछुट' (१९९२) असे अन्य कवितासंग्रह आहेत. प्रातिनिधिक कवितासंग्रह म्हणून 'निर्वाचित कबिता'चे महत्त्व असून प्रसिद्ध बंगाली अनुवादक मृणालिनी गडकरी यांनी या कवितांचा समर्पक मराठी अनुवाद केला आहे.

 या सर्व कवितांमधून स्त्रीची तगमग स्पष्ट होते. स्त्रियांवर होणारे अन्याय, स्त्रियांची होणारी प्रतारणा, कुचंबणा, घुसमट, बंधने या सर्वांना या कवितांमधून वाचा फोडण्यात आल्याने सर्व स्त्रियांनी या कविता वाचायला हव्यात. ज्याला पुरुषाने स्त्री सुखाची संज्ञा दिली ते सुख नसून मतलबी शोषण आहे, याची जाणीव या कविता करून देतात. पुरुषांना त्या आपल्या अपराधाबद्दल अंतर्मुख करतात म्हणून त्यांनीही त्या वाचल्याच पाहिजेत. अशा उभयपक्षी वाचन व्यवहारातूनच स्त्री-पुरुष एकमेकांना मनुष्य मानून व्यवहार करणार, करतील अशी आशा करत तसलिमा नसरीन यांनी त्या लिहिल्यात. त्या विचारतात -

 'एखाद्याच्या सहवासात सबंध आयुष्य घालवलं
 तरी खरंच माणूस ओळखता येतो का?'

 'शुभ विवाह' कवितेत त्या समजावतात विवाहाच्या नावावर हिडीस पुरुष एका जिवावर कब्जा मिळवतात नि तिनं सोनेरी मेणबत्तीसारखं प्रेमात विरघळून जावं अशी अपेक्षा करतात. वर त्यांची अपेक्षा असते स्त्रीनं पातिव्रत्य राखावं. पुरुषी पातिव्रत्याची हमी नाही का मागायची स्त्रीनं? -

 सर्व पुरुष सभ्यच असतात
 त्यांना नाही लागत पातिव्रत्याची सनद.

 पुरुषांनी स्त्रीला हरत-हेने दुबळी करून ठेवले आहे. तिने मैदान ओलांडायचं नाही. तिने तळ्यात पोहायचं नाही. तिने एकटीनं उंबरा ओलांडायचा नाही. तिला नाही का वाटत...चांदण्यात फिरावं, नौकाविहार करावा, पावसात भिजावं... पण नाही. ती नाजूक, तिला सर्दी, तिलाच ताप.

 क्षणासाठी घराचा उंबरठा ओलांडू देत नाही कोणी
 स्वप्नात नाही तर जागेपणीच पाहते
 विषारी साप, सुरवंट, राक्षसांचं घर आणि रानटी रेडा.

 समाजात स्त्रीला घेरणारा फक्त पुरुष नाही. समाजाने तिच्याभोवती जात, धर्म, लिंग, भाषा, प्रांत अशी कितीतरी काटेरी कुंपणं उभी केलीत. शिवाय देव, दैव, भविष्याचे ललाटलेख सटवाईने लिहून ठेवलेले नि कर्म

वाचावे असे काही/१५७