पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/114

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनुष्यबळ नसल्याने आबाळ होणाऱ्या वृद्ध रुग्णांची सेवा, शुश्रूषा करणारे हे केंद्र. डॉ. दिलीप शिंदे यांनी आपलं राहतं घर या केंद्रास देऊन ते स्वतः भाड्याच्या घरात राहू लागले आहेत. ही सारी डॉक्टर मंडळी आता या वृद्ध रुग्णांचे सेवाभावी पालक बनलेत. या मंडळींचं काम पाहून सांगलीतल्या तरुण महिला डॉक्टरांनी यांच्यापुढे एक पाऊल टाकले आहे. त्या रुग्णाच्या घरीच जाऊन सेवा, शुश्रूषा करू लागल्यात. डॉक्टरांबद्दल समाज साशंक होत असल्याच्या काळात हे प्रयत्न, पर्याय म्हणजे अजून जग पूर्ण अंधारलं नाही याची आश्वासक खूण! या संवेदनशील पार्श्वभूमीवर डॉ. दिलीप शिंदे यांचं 'रुग्णानुबंध' पुस्तक वाचताना लक्षात येतं की डॉक्टरांनी यांत्रिक उपचारांमागे न धावता रुग्णांशी हितगुज केले तर किती व्याधी उपचारापूर्वी व उपचाराशिवायही बऱ्या होऊ शकतात. आज रुग्णांची खरी गरज आहे ती - त्यांना त्यांचं ऐकणारा डॉक्टर हवाय... ऐकू येणारा... ऐकू इच्छिणारा... अशा डॉक्टरांच्या या आठवणीच वाचकांसाठी उपचार बनतात.

 'रुग्णानुबंध' पुस्तक डॉक्टर नि रुग्ण यांच्यात आत्मीयता व सुसंवाद असण्याची गरज अधोरेखित करते. या पुस्तकास डॉ. नरेंद्र दाभोलकरांची 'भूमिका' लाभली आहे. त्यात त्यांनी डॉक्टर-रुग्ण यांच्यामध्ये विश्वासाचे नाते महत्त्वाचे मानले आहे. सदर पुस्तकास महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे माजी कुलगुरू व आरोग्य संबंधी लेखन करणाऱ्या डॉ. रवी बापट यांची प्रस्तावना आहे. त्यात त्यांनी डॉक्टरांची 'जागल्या' म्हणून असलेली जबाबदारीही विशद केली आहे.

 रुग्ण डॉक्टरांकडे आला की मोकळेपणाने बोलेल तर डॉक्टर योग्य उपचार करू शकतात. दिनकर नावाचा एक व्यसनी रुग्ण पुढे निर्व्यसनी होतो तो कायमचा. एक लेखक दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण'. एक मूल झालेली पत्नी खेड्यातल्या डॉक्टरांच्या पैशाच्या लोभाने गर्भाशय गमावते. ती कायमची अकारण वांझ बनून आयुष्य काढते. नाबाद शतक पूर्ण करणारे नाना निवर्ततात नि पाठोपाठ नानी जाते. असं असतं - असायला पाहिजे पती-पत्नी नातं. मित्राशी लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवणारी तरुण मैत्रीण. गर्भधारणेनंतर हैराण. डॉक्टरांना पैशात मोजू इच्छिणारी. सेवाभावी दवाखान्यात नेतात तर तिचे सुशिक्षित पालक या सत्कार्याकडे कसे पाहतात, डॉक्टरांशी कसे वागतात हे सर्व 'रुग्णानुबंध' मधून वाचत असताना लक्षात येते की डॉक्टर नि रुग्ण या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. त्या परस्पर संवादी असतील तर समाज, मानवी ऋणानुबंध सद्भावी

वाचावे असे काही/११३