पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/113

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रुग्णानुबंध डॉ. दिलीप शिंदे साधना प्रकाशन, ४३१, शनिवार पेठ, पुणे - ४११०३० प्रकाशन - २०१२ पृष्ठे - १८०, किंमत - रु. १५०/-



रुग्णानुबंध

 लहानपणीच्या पाठ्यपुस्तकात 'आजारीपण' नावाची एक कविता होती. लहान मुलांना आजारी पडायला का आवडतं याचं सुंदर वर्णन त्या कवितेत होतं. त्याचं धृवपदच होतं, 'पडू आजारी। मौज हीच वाटे भारी।।' आजारपण मौज वाटायचा काळ इतिहासजमा झाला आहे. उलटपक्षी काळ असा विचारता झाला आहे की, 'असले आजारपण गोड। असूनि कण्हती का जन मूढ?' फॅमिली डॉक्टरची कल्पना जाऊन डॉक्टर कन्सलटंट, रिपोर्टर झाला. त्यांना कागद वाचता येतो, माणूस नाही! फॅमिली डॉक्टर माणूस वाचायचा. रुग्ण आणि डॉक्टरमध्ये ना पडदा होता ना कागद! हे सारं आठवायचं कारण घडलं ते हाती आलेलं एक पुस्तक. त्याचं नाव आहे 'रुग्णानुबंध'. लेखक आहेत डॉ. दिलीप शिंदे. चाळिशी उलटलेला हा प्रौढ डॉक्टर. त्यांनी साप्ताहिक साधना, पुणे मध्ये सन २०११-१२ च्या दरम्यान याच शीर्षकाने एक सदर चालवले होते. त्याचा हा संग्रह. रुग्णांशी असलेल्या डॉक्टरांच्या ऋणानुबंधाच्या या आठवणी. डॉ. दिलीप शिंदे हे सांगलीतील एक कर्ते सुधारक डॉक्टर होत. ते आणि त्यांच्या काही सहकारी डॉक्टरांनी मिळून सांगलीत 'संवेदना शुश्रूषा केंद्र' चालवले आहे. अंथरुणाला खिळलेल्या, शुश्रूषा, उपचाराची नितांत गरज असलेल्या आणि घरी करायला

वाचावे असे काही/११२