पान:वाचन (Vachan).pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याला चिकटलेला अर्थ समजून घेऊन योग्य ठिकाणी, योग्य शब्द वापराचे सामर्थ्य येणे होय. असे सामर्थ्य निर्माण करणे हा वाचनाचा हेतू असतो. माणसाच्या वयाप्रमाणे त्याची भाषिक समज वाढत जाते. वाचन ऐकण्या, बोलण्याच्या व समाज व्यवहारांच्या वैविध्यातून संपन्न होते. वाक्य, वाक्प्रचार, म्हणी, अलंकार, उपमा इत्यादी ज्ञानाने भाषिक कौशल्यात वाढ होत भाषिक समज विकसित होते. लेखनाचा आशय, दोन शब्दांमधील गर्भित अर्थ, सूचक अर्थ माणूस तर्काने प्राप्त करतो. हे आकलन कौशल्य विकसित करणं हे वाचनाचं लक्ष्य असतं.
५.४.३ भाषिक सौंदर्य व कौशल्य (Fluency)
 माणसाचं वाचन जितकं चतुरस्र व विविध भाषा, ज्ञान, विज्ञानाच्या सीमा पार करत व्यापक होत जातं, तितकं त्याचं भाषिक प्रभुत्व वाढतं. या प्रभुत्वातून त्याची भाषा शब्दशक्ती, अलंकार, सुभाषितं, वाक्प्रचार, म्हणी इत्यादींनी फक्त सुंदरच होत नाही, तर भाषिक सौंदर्याच्या, अभिव्यक्तीच्या लकबी, कुशलता, आरोह, अवरोह, यती, विरामचिन्हांनुसारी वाचन, उच्चारण अशी अनेक कौशल्ये वाचकात विकसित होत असतात. भाषिक सौंदर्याची जाण निर्माण करणे, तशी कौशल्ये वर्धिष्णू करणे हा वाचनाचा उद्देश प्रौढ खरा; पण त्यातून भाषा सामर्थ्याची प्रचिती येत असते. भाषेचा अस्खलित वापर वाचनाशिवाय अशक्य.
५.४.४ साहित्य अभिरुची विकास

 भाषा नि साहित्याचा परस्परपूरक संबंध असतो. एकमेकांमुळे दोन्ही विकास पावतात. वाचकाचे वाचन बहुविध असते ते भाषा, शास्त्र, लिपी, साहित्य, संस्कृती अशा अंगांनी. वाचन अभिरुचीमुळे आपण विविध भाषा शिकतो. विविधभाषी वाचनामुळे आपणास साहित्य श्रेष्ठत्वाची जाणीव होते. एकभाषी वाचन संकुचित असते. तीच गोष्ट विविध ज्ञान-विज्ञानांची. साहित्य, काव्यशास्त्र, भाषा विज्ञान, तत्त्वज्ञान, भौतिकशास्त्र, संगीत असं सारं माहीत असण्यानं आपल्या प्रश्न, समस्या, जगणं इत्यादींसंबंधी अष्टपैलू दृष्टिकोन तयार होतो. शिक्षित माणूस समजदार, सुजाण, सुसंस्कृत करणे हे साहित्य अभिरुची विकास, विस्तारातूनच शक्य असते. म्हणून केवळ भारतीयच नाही, तर युरोपीय, आशियाई, आफ्रिकी असे विविध खंडांतील साहित्य अभ्यासाच्या जाणिवा वाचन उद्देश लक्षात घेऊनच होत राहतात. साहित्य प्रेम वाढविणे हाच वाचनाचा प्रमुख हेतू असतो.

वाचन/७५