पान:वाचन (Vachan).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५.४.५ संवाद, संपर्क विचार
 जो अधिक वाचतो तो अधिक आत्मविश्वासी होतो. भाषिक कौशल्य व प्रभुत्व आजच्या माहिती आणि संपर्क युगात आवश्यक जीवन साधन बनून गेलं आहे. माणूस प्रवासी झाल्याने बहुभाषी संवाद त्याची जीवन गरज बनून गेली. तो पर्यटक, प्रवासी झाल्याने त्याची जीवनशैली बदलली. यातून त्याच्या भाषिक गरजा वाढल्या. आज त्याला एकाचवेळी स्थानिक व जागतिक भान लागते. भारतीय भाषांबरोबर जागतिक भाषा येणं आवश्यक झालं. समाज संपर्क, संवाद ही जीवनाची गरज वाचन आणि भाषा विकासाशिवाय असंभव. असं संवाद, संपर्क कौशल्य शिकवणं हाच वाचनाचा हेतू. तो वाचन, भाषा व्यवहारातूनच विकसित होणे शक्य असते.
५.४.६ कल्पना सामर्थ्य व भावसाक्षरता
 वाचनामुळे कल्पना करण्याचे सामर्थ्य जसे वाढते, तशी तर्क करण्याची शक्तीपण विस्तारत असते. ती विस्तारणे हाच मुळी वाचनाचा हेतू असतो. लेखक साहित्य निर्माण करतो ते कल्पना आणि वास्तवाचा मेळ घालत. सामान्य माणसापेक्षा लेखक, कवी, कलाकार वेगळा ठरतो ते प्रतिभेमुळे. प्रतिभेचे बलस्थान असते कल्पना सामर्थ्य, साहित्यामुळे वाचकात भावसामर्थ्य निर्माण करून माणसाला संवेदी बनविणे, परहितदक्षी, सहिष्णू बनविणे हाही वाचनाचा हेतू असतो. वाचनामुळे गुणावगुणांच्या भेदांची जाणीव होऊन वाचक सुसंस्कृत होतो. ते वाचन त्याला दया, क्षमा, शांतीचे महत्त्व समजावते म्हणून. शिवाय हिंसा, क्रोध, घृणा, प्रलोभन मुक्त माणूस घडविणे हा वाचनाचा हेतू असतो, हे विसरून चालणार नाही.
५.४.७ आत्मभान विकास

 वाचनात माणसाला अंतर्मुख करण्याची क्षमता अन्य कोणत्याही साधन, माध्यमांपेक्षा अधिक असते. माणूस वाचतो त्या क्षणी त्याची विचार प्रक्रिया गतिमान असते. ती त्यास गुणदोषांची जाणीव देऊन अंतर्मुख करते. त्यातून आत्मभान येते. ते निर्माण करणे वाचनाचा मूळ हेतू असतो. प्रगल्भ वाचन षडरिपूंवर विजय मिळवू शकते. जग, जीवन म्हणजे विविध रंग, गंध, रस, स्वादांचे संमेलन. ते सर्व एकाच प्रकारचे असत नाही. राजस, तामस, सात्विक असं त्यांचं स्वरूप वैविध्य असतं. ते चांगल्या, वाईट सवयी, वृत्ती निर्माण करतं. अहिंसा, सत्य, अस्तेय इत्यादी एकादश व्रते माणसास सत्शील बनवत असतात. असं वाचकास बनविणे हा वाचनाचा उद्देश.

वाचन/७६