पान:वाचन (Vachan).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘ता' वरून ताकभात सूचित करणारी झाली. हा सारा अनर्थ शोध साधनांच्या भाऊगर्दीने व जीवघेण्या गतीने घडून आला. माणसाचा ‘कासव' व्हायचा तिथे ‘ससा' झाला. सशाचे सिंहावलोकन करत असता आज संशोधक सांगत आहेत की, अॅमेझॉन, गुगल, फ्लिपकार्ट हे काही वाचन वर्धनाचे उपाय नव्हेत. अॅप्स, किंडल, मोबाइल्स, टी.व्ही., सिनेमा, वाचनाची सजीवता गमावत निर्जीव झाल्याने सजीव माणसाचे वाचन निरंक (Nil) होत आहे. कागद, पेन, पेन्सिल, पाटी, पुस्तक पुन्हा देणेच त्यावरचा उपाय होय. कारण त्या वस्तू होत. पान पलटताना बोटांना होणारी स्पर्श, भावना, पुस्तकाच्या निकटतेने - वास, हालचाल, पलटणे, उलटणे, चाळणे यात जी आत्मीयता आहे; ती ई-कंटेंट देत नाहीत. शिवाय ती इलेक्ट्रॉनिक साधने गतीचा ससेमिरा लावतात. या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे परत पुस्तक हाती देणे हाच आहे.
५.४ वाचनाचे उद्देश
 माणूस का वाचतो असं विचाराल, तर त्याचं उत्तर एका वाक्यात नाही देता येणार. कारण माणूस अनेक उद्देश, हेतू मनात ठेवून वाचत असतो. शिवाय वय, मानसिक स्थिती, गरज लक्षात घेता वाचन माणसात इतक्या परीने उपयोगी होत असते की, उद्देशांची यादी करणेच अशक्य. तरीपण काही मूलभूत गरजा म्हणून माणसाचं वाचन होत असतं. बालपणापासून ते वृद्धावस्थेपर्यंत माणूस वाचत राहतो; पण वयपरत्वे वाचनाच्या गरजा बदलत राहतात. बालपणीचं वाचन शिकण्यासाठी असतं, तर वानप्रस्थात ते शहाणपण वाढविण्यासाठी होते.
५.४.१ शब्दार्थ ओळख व संग्रह
 बालपणीचं वाचन स्वर, व्यंजन उच्चारणापासून सुरू होतं. मग ते स्मरण केलं जातं. अक्षरं गिरविली जातात. मग येतात शब्द, शब्दांनी बनतात वाक्ये. वाक्ये आली की, मनातली उत्तरं देणं आलं. या सर्व प्रक्रियेत माणूस स्वर, व्यंजन, अक्षर, शब्द, वाक्यरचना शिकत शब्दसंपदेच्या जोरावर भाषिक कौशल्य प्राप्त करत असतो. शब्द, त्यांचे अर्थ, शब्दसंग्रह गाठी असल्याशिवाय माणूस ना बोलू शकतो, ना लिहू, ना विचार करू शकतो. वाचनाचा हेतूच अशी भाषिक बैठक तयार करणे असतो.
५.४.२ आकलन

 वाचन म्हणजे केवळ अक्षर, चिन्ह, अंकांचा उच्चार असत नाही, तर

वाचन/७४