पान:वनस्पतिविचार.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१४ वे ].    शोषणाच्या अन्य रीति व श्वासोच्छ्वास क्रिया.    १२१
-----

कित्येक वेळां हुशार माळी मृदु तंतुकाष्ठांवर प्रयोग करून फायदा करून घेतो. एखादेवेळेस झाड चांगले वाढलेले असून त्यास फळे येत नाहीत, अशा वेळेस माळी चाकूने संवर्धक पदरापर्यंत फांदीवरील एक इंचभर जागा कापून टाकतो, त्यामुळे वर जाणारा पाण्याचा प्रवाह पूर्वीप्रमाणे चालून तयार झालेले सेंद्रियपदार्थ खाली येण्याचे थांबतात, वरील फांदी जास्त वाढून त्यावर फुले व फळे येऊ लागतात. असला प्रयोग वरचेवर होऊ दिल्यास फायदा न होतां झाड अजीबात वाळून जाण्याचा संभव असतो. खालील भाग वरून सेंद्रिय पदार्थ न येऊ दिल्यामुळे खालील भाग सुकत जातो. अशा प्रयोगास ‘वळी बांधणे' ( Ringing ) म्हणतात.

 सत्त्व अथवा सत्त्वासारखे दुसरे कण द्रवस्थितीत नेले जातात. प्रत्येक पेशींची भित्तिका सूक्ष्म व छिद्रमय असल्यामुळे त्यांतून सात्विक द्रव हळुहळु वाहत जातो. प्रत्येक पेशींत हा रस गाळिला गेल्यामुळे तो दोषरहित होतो. पुष्कळ वेळां असा प्रश्न उद्भवतो की, असल्या पेशिमालिकेची काय जरूरी आहे ? पेशी-मालिकेऐवजी रसवाहक नळ्या सार्वत्रिक असत्या तर रस ने आण करण्याचे काम जास्त सुलभ झाले असते, दिसण्यांत प्रश्न योग्य वाटतो, पण नैसर्गिक गोष्टी व तजविजी योग्यच असतात. पेशी-मालिकेत भित्तिका असल्यामुळे सात्विक द्रवाचा प्रवाह सारखा व्यवस्थित चालून तो थोडा थोडा प्रत्येक पेशीत खेळत राहतो. तो रस एका जागीच सर्व जमत नाहीं. पेशीच्या नळ्या असत्या तर तो एका जागी जमून राहण्याचा अधिक संभव आहे. रस सार्वत्रिक न खेळतां केवल एका जागी सांठणे हे वनस्पतीच्या आरोग्यदृष्ट्या चांगले नसते; म्हणून पेशिमालिकेंत भित्तिका असणे अवश्य आहे. शिवाय पेशिमालिकेंतून रस वाहत असतांना त्याचे भिन्न भिन्न रूपांतर होत असते. सत्त्वापासून साखर अथवा नायट्रोजनयुक्त द्रव्ये वगैरे तयार होतात. ह्या निरनिराळ्या स्थित्यंतरामुळे जीवनकण व पेशी-घडणात्मक द्रव्ये उत्पन्न होतात, म्हणून पेशिमालिका केवळ रस वाहकच आहे असे नाही, तर त्यांत वनस्पतिसंवर्धनास योग्य असे फेरबदल होत जातात.

 श्वासोच्छ्वासक्रिया:--वनस्पतिशरीरांत बाष्पीभवन, कार्बन संस्थापन, वगैरे क्रिया जशा महत्त्वाच्या आहेत, तशीच श्वासोछ्वासक्रिया महत्वाची आहे.