पान:वनस्पतिविचार.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१२२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

जोपर्यंत प्राणी अथवा वनस्पति जिवंत असतात, तोपर्यंत ही क्रिया सारखी चालू राहते. ही क्रिया मृत्यूबरोबर बंद होते. रात्रीं, दिवसा निद्रितावस्थेत तसेच जागृतावस्थेत ही क्रिया चालत असते. प्राणी वर्गात ही क्रिया चालविण्याची जी विशिष्ट अवयवें असतात, त्यांस फुफ्फुसें ह्मणतात. वनस्पतिवर्गात असली अवयवे नसल्यामुळे तिच्या प्रत्येक जिवंत पेशींत ही क्रिया चालते. ह्या पेशी सुर्यप्रकाशाकडे हवेत असोत अथवा जमिनीत गाडलेल्या राहोत, सूक्ष्म असोत वा पूर्ण वाढलेल्या असोत, ह्या सर्वांतून ही क्रिया सारखी सुरू असते. श्वासोच्छ्वास बंद होणे म्हणजे मरणें, अथवा जिवंत असणे व श्वासोच्छ्वास करणे ही दोन्ही समानार्थी उपयोग करतात. हा नियम सर्व सजीव कोटीस लागू असतो; मग ती कोटी प्राणिवर्गाची असो अथवा वनस्पतिवर्गाची असो.

 वनस्पतिशरिरांत कार्बनसंस्थापन झाल्यामुळे सेंद्रिय पदार्थ बनण्यांत सूर्य किरणांची शक्ति खर्चिली जाऊन त्यांत त्या शक्तीचा गुप्त सांठा राहतो. ह्या सांठलेल्या शक्तीचा उपयोग होण्यास श्वासोश्वासक्रियेची जरूरी असते. श्वासोश्वास क्रियेने हे शक्तीचे सांठे फोडून साधे केले जातात. त्या शक्तींचा सजीव तत्वास उपयोग होतो. सजीव कणांच्या चांचल्यशक्तीमुळे सूर्यप्रकाशांत हरितवर्ण शरीरें बनून त्यापासून पुनः नवीन सेंद्रिय पदार्थ उत्पन्न होतात, एकंदरीत हो रहाटगाडगे सुरळीत चालावे म्हणून दोन्ही क्रिया परस्पर सहाय्य करितात. एका क्रियेने कार्बन संस्थापन करावेत ह्मणजे सेंद्रिय पदार्थ बनवावेत व दुसऱ्या क्रियेमुळे त्या पदार्थांचा उपयोग जीवनकणांस होत जावा. जोपर्यंत श्वासक्रियेचा परिणाम सेंद्रिय पदार्थावर होत नाही, तोपर्यंत शरीरसंवर्धनाकडे त्यांचा उपयोग होणार नाहीं. रेलवेच्या कारभारांत दोन खातीं मुख्य असतात. एक ट्रॅफिक् खाते व दुसरे लोको खाते. ट्रॅफिक् खात्याकडून दररोज शेकडो रुपये जमविले जातात; पण लोकोखात्याकडून त्या रुपयांचा खर्च केला जातो. लोकोखाते रुपये खर्च करून ट्रॅफिक् खात्यास अधिक उत्पन्न मिळविण्याची साधनें तयार करते. इंजिंने बांधणे, गाड्या तयार करणे, वगैरे गोष्टी लोको खातेच करिते; पण या गोष्टींचा परिणाम ट्रॅफिक् खात्यास उत्पन्न वाढविण्याकडे होतो, नुसते ट्रॅफिक् खाते अथवा नुसते लोकोखाते कधीही चालणार नाहीं. परस्पर दोन्हींची सांगड असणे जरूर आहे. एकाने उत्पन्न करावे,