पान:वनस्पतिविचार.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



११६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

अन्य प्रकारे अन्न-द्रव्ये शोषण करितात. वरील नियम साधारण वनस्पतीचा असतो. असल्या वनस्पति दोन्हीं उच्च तसेंच क्षुद्र वर्गामध्येही आढळतात. आळंब्याचा वर्ग सेंद्रिय पदार्थ तयार करू शकत नाही. त्या वनस्पतींत हरितवर्ण नसतो. अशांना तयार सात्विक सेंद्रिय पदार्थ मिळाले पाहिजेत, म्हणजे त्यांची वाढ होते. म्हणून आळंब्या सेंद्रिय पदार्थावर वाढलेल्या आढळतात; त्या पदार्थांमधून सेंद्रिय पदार्थ खाऊन आपलें पोषण करतात. भूछत्रे ( Mushrooms ) नेहमी मृत सेंद्रिय पदार्थांवर उगवतात, त्यांस ते पदार्थ तयार करता येत नाहीत, म्हणून घाणेरडे सेंद्रिय पदार्थ भक्षण करून आपली उपजीविका करितात. उच्च वर्गामध्ये सुद्धा ह्या वनस्पति आपली मुळे दुसऱ्या झाडांच्या शरीरांत खुपसवून अन्न शोषण करतात. ह्यापैकी काहींना आपले भक्ष्य स्वतंत्रपणे तयार करता येते. ज्या वेळेस मूळ झाडांची पाने गळून नवीन सेंद्रिय पदार्थ पूर्वीप्रमाणे तयार होत नाहीत, अशा वेळेस बांडगुळे स्वतः सेन्द्रिय पदार्थ तयार करून आपणास व आपल्या यजमानास पुरवितात. बांडगुळाची पाने हिरवी असल्यामुळे त्यास ह्या रीतीनें अन्न तयार करता येते. तेव्हां वृक्षादनी ( Parasites ) सुद्धा आपला नेहमीचा साधा नियम सोडून कधी कधी अन्य रीतीनें अन्न मिळवितात,

 ह्याच मालिकेत मांसाहारी वनस्पति येतात. कारण मांसहारी वनस्पति, किडे व कीटक खाऊन उपजीविका करितात. सेंद्रिय पदार्थ शरीरात तयार करण्याचे भानगडीत न पडतां आयत्या तयार मांसान्नावर निर्वाह करणे त्यांस बरे वाटते. किडे अथवा कीटक फसून त्यांचे भक्ष्य व्हावेत, या कारणाकरिता निरनिराळे मधुरस त्यांच्या चमत्कारिक शरीराच्या भागांत सांठविले असतात. एकदा जे किडे मधुरसास लुब्ध होऊन त्यांचे पानांत घुसतात, ते पुनः सुटून बाहेर जाऊ शकत नाहीत. अशा वनस्पतींच्या पानांत निरनिराळी विशिष्ट रचना आढळते. कांहींचा देठ पोकळ असून आंत कांहीं पाचक आम्लें व रस असतात. किडे रस पिऊ लागले म्हणजे त्या आम्लाचे योगाने त्यांचे शरीर भाजून जाते, व हळु हळु ते कुजू लागते. शरीर पूर्ण कुजल्यावर वनस्पति त्याचा उपयोग करून घेतात. कांहीं वनस्पति शरीर कुजेपर्यंत वाट पहात नाहींत. किडे गुरफटून मेल्यावर आंतून पाचक आम्ल निघून त्या किड्यांचे