पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माणसाचा विश्वास जेव्हा स्वत:च्या विवेकावर असतो तेव्हा अशक्य ते शक्य होतं. भ्रष्टाचारमुक्त राजकारण आज अशक्य मानलं जातं तसं ते त्या वेळीही मानलं जायचं. पण गृहीतं खोटी ठरविण्याचा ध्यास घेतलेला हा सामाजिक फकीर. त्यानं मूल्यनिष्ठांच्या शर्यतीत भल्या-भल्यांना मागे टाकलं ते केवळ आपल्या जाज्ज्वल्य जीवननिष्ठांच्या बळावर. मी पिंपळगाव विद्यालयात शिक्षक असतानाच्या वर्षभराच्या अल्पकाळात आजगावकर सरांचा संपर्क आला नि मला माझ्या मर्यादांची प्रकर्षाने जाणीव झाली. आयुष्यभर खेड्यात जेठा मारून उभं राहणं एका पायावर तपस्या करणाच्या हठयोग्यापेक्षा कमी श्रमाचं, संयमाचं, निष्ठेचं नसतं! हे सारं करताना केल्याचा अहंकार, प्रसिद्धी कधी नाही. सतत सर समाजाच्या रकान्यात राहिले. असं आजन्म रकान्यात राहणं केवळ अदम्य ध्येयवादामुळेच शक्य होतं.

माझे सांगाती/१४