पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मूल्याधारित धर्मनिरपेक्ष कार्य : अॅड. के. ए. कापसे

 प्रत्येक मनुष्य जन्मतो, तो एक सामान्य म्हणूनच. तो असामान्य होतो ते आपल्या जीवन, कार्य, कर्तृत्व, मूल्य, निष्ठा, जीवनशैली, वृत्ती, इत्यादींमुळे. अॅडव्होकेट के. ए. कापसे यांचंही तसंच आहे. त्यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांनी आपला वकिली व्यवसाय व्रत, निष्ठा, तपस्या, मूल्य म्हणून सांभाळला नि त्याच्या जोरावर ते नामांकित, प्रतिष्ठित वकील, समाजहितसेवी बनले. मी त्यांना ओळखू लागलो ते सन १९८० नंतरच्या काळात. मी काहीबाही सामाजिक काम त्या वेळी करू लागलो होतो. कोल्हापूरच्या विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, ट्रस्टस्मध्ये माझी लुटुपुटुची लुडबुड असायची. त्या काळात प्रिन्सिपॉल शं. गो. दाभोळकर, अॅड. मामासाहेब वर्धमाने, श्रेष्ठी वकील प्रभृती समाजजीवनात आपल्या कार्यकर्तृत्वाने घर करून होत्या. त्या काळात मामा वर्धमानेंचा अमृतमहोत्सव साजरा झाला होता. मी त्यांची स्मरणिका संपादित करीत होतो. त्या वेळी त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारताना मी अँड. मामासाहेब वर्धमाने यांना विचारलं होतं की, “तुम्ही निष्णात वकील, पट्टीचे वक्ते, बिनीचे कार्यकर्ते, नि:स्पृह समाजसेवक. ही परंपरा तुम्ही नव्या पिढीत कुणामध्ये पाहता?" तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, “समाजात (जैन) म्हणाल तर अॅड. के. ए. कापसे, व्यवसायात (वकील) म्हणाल तर पी. आर. मुंडरगी अन् राजकारण, समाजकारणात म्हणाल तर अॅड. गोविंद पानसरे.' पुढे या तिघांबरोबरही

माझे सांगाती/१५