पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांना नेहमी विषण्ण करीत राहायचं. आजगावकर सर हे सर्व सामावून घेणा-या समुद्रासारखे होते. एखाद्या योग्यासही लाजवेल असा त्यांच्यातील संयम, सहनशक्ती अशी की प्रत्येक कळ दाबून ठेवायची. त्यांच्या मौन व्यवहारात एक ठसठसणारा ज्वालामुखी सतत आतल्या आत खदखदत असायचा. “आपलं दु:ख आपल्यापाशी' अशी त्यांची अबोल वृत्ती. समाजाला घडवायचं, उभारायचं हा एकच ध्यास, ध्येयवाद. त्यांच्या शाळेत ते असले, नसले तरी फार फरक पडायचा नाही, असा ठरलेला परिपाठ.
 त्यांच्या सर्व शाळांत राष्ट्रीयत्वाचे संस्कार प्रकर्षाने दिसून यायचे. खेड्याला शोभेल अशी टोपी सर्व विद्यार्थी घालायचे. पांढरा शर्ट, खाकी पँट घालणारी मुलं भारताचे प्रतिनिधी होती. मुलीही तशाच. पांढरं पोलकं नि निळा परकर. पुढे तो स्कर्ट झाला; पण भारतीय मर्यादेचं भान त्यांच्या शाळांनी कधी सोडलं नाही. शिक्षक सारे निवासी असण्याचा कटाक्ष असायचा. रात्रीची अभ्यासिका चालायची. वीज गेली की अभ्यासिकेतील मुलं कविता म्हणायची- सामूहिकपणे. कृती छोटी असली तरी संस्कारांचं भान त्यात असायचं. साच्या शाळेत साधेपणाचा सरळ दरवळ त्यांच्या शाळांना राष्ट्रीय बनवून टाकायचा. या सर्वांमागे आजगावकर सरांची धडपड, ध्येयदृष्टी होती, हे वेगळे सांगायला नको.
 सरांनी शिक्षणप्रसाराचं भान नसलेल्या गावा-समाजात शाळा सुरू केल्या नि तो आसमंत शिक्षित, संस्कारित केला. त्यामुळे आज उत्तूर, आजरा, गडहिंग्लजच्या पंचक्रोशीत आजगावकर सर नुसते शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक असत नाहीत. ते जनतेच्या लेखी असतात एक आदर्श समाजशिक्षक.

 ‘अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत आमुच्या आशा, किनारा तुला पामराला सारख्या गर्वगीताच्या ओळी सार्थ करणारं जीवन घेऊन आलेले आजगावकर सर विसाव्या शतकातील कोलंबसच होते. त्यांनी जी गावं शोधली ती । त्यांच्यापूर्वी शैक्षणिक नकाशावर नव्हती. जेव्हा ती नकाशावर आली तेव्हा लोकांना त्यांच्या शाळांसाठी नव्या खुणा शोधायला लागल्या त्या आजगावकर सरांनी खाल्लेल्या जगावेगळ्या खस्तांमुळेच. मुलींच्या शिक्षणाची गंगा उत्तूरच्या पंचक्रोशीत वाहू लागली याचं श्रेय आजगावकरांनाच दिलं पाहिजे. उत्तूरमध्ये सहकाराचा शुभारंभ सरांनीच केला. कामगारांच्या संघटनेचा गडहिंग्लजमध्ये केलेला सरांचा प्रयोग त्यांच्या दूरदृष्टीचाच परिचय. राजकारण हे समाजपरिवर्तनाचं साधन असतं, हे सरांनी आपल्या कर्तृत्वानं दाखवून दिलं. साधनशुचिता पाळणं हे न पेलणारं शिवधनुष्य; पण सरांनी ते सभापती होऊनही पेलून दाखवलं.

माझे सांगाती/१३